पुणे लोकसभा : राष्ट्रवादीला हवाय काँग्रेसचा मतदारसंघ, संजय राऊतांनी सुनावलं
पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मविआतील दोन पक्ष आमने-सामने का आलेत आणि खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीला काय सुनावलं, हेच समजून घेऊयात…
ADVERTISEMENT

“प्रशांत जगताप यांना खासदार होण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार घटक पक्ष एकत्र बसून ठरवू. पण, नवा चेहरा दिल्यास जनताही त्याला पसंत करते”, हे विधान आहे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं. एप्रिल 2023 मध्ये अजित पवारांनी हे विधान केलं आणि त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली. पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मविआतील दोन पक्ष आमने-सामने का आलेत आणि खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीला काय सुनावलं, हेच समजून घेऊयात…
स्व. गिरीश बापट यांचं निधन झालं. बापट पुण्याचे खासदार होते, त्यामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर दावा केला गेला. याची सुरूवात झाली, प्रशांत जगताप यांच्याकडून. प्रशांत जगताप यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर अजित पवार यांनी ‘प्रशांत जगताप यांना खासदार होण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा’, म्हणत शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघांवर दावा केला गेला. काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार यांनी ही मागणी केली. तेव्हापासून दोन्ही पक्षात रस्खीखेच सुरू झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसला का हवाय काँग्रेसचा मतदारसंघ?
पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना अजित पवार असं म्हणाले की, “पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे. कुणाचे आमदार जास्त आहेत, ते पाहिले पाहिजे. तसेच काँग्रेसला पडलेली मतेही विचारात घ्यावी लागणार आहेत. एखाद्या मतदारसंघात जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथे जास्त असेल, तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे.”