Vasai-Virar: भाई ठाकूरची निर्दोष सुटका, 34 वर्षांपूर्वीचं ‘ते’ भयंकर प्रकरण आहे तरी काय?
देशातला शेवटचा टाडा खटला अखेर संपला. पुणे कोर्टानं सुरेश दुबे खून प्रकरणी भाई ठाकूर, गजानन पाटील, दीपक ठाकूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जाणून घ्या ते प्रकरण आहे तरी काय.
ADVERTISEMENT

मुंबई: देशातला शेवटचा टाडा (TADA) खटला अखेर संपला. पुणे कोर्टानं सुरेश दुबे खून प्रकरणी भाई ठाकूर, गजानन पाटील, दीपक ठाकूर यांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल 34 वर्षांनंतर हा निकाल लागला. पण, सुरेश दुबे हत्या प्रकरण नेमकं काय होतं? भाई ठाकूर (Bhai Thakur) कोण होता? भाई ठाकूरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर (Sharad Pawar) काय आरोप झाले होते? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (bhai thakurs acquittal what about the suresh dubey murder case of 34 years ago)
नेमकं प्रकरण काय होतं?
घटना आहे 34 वर्षांपूर्वींची… तारीख 9 ऑक्टोबर 1989. वेळ सकाळी साडेदहा वाजताची आणि ठिकाण होतं नालासोपारा रेल्वे स्थानक. याचठिकाणी बिल्डर सुरेश दुबे यांची एका टोळीनं गोळ्या घालून हत्या केली. हा तोच बिल्डर होता जो वसई-विरारमधला डॉन भाई ठाकूरला भिडला होता. मुंबईवर राज करणारे असे अनेक डॉन त्यावेळी होते. पण, वसई-विरारमध्ये फक्त एका नावाची दहशत होती ती म्हणजे भाई ठाकूर.
हाजी मस्तान, दाऊद इब्राहीमसोबत भाई ठाकूरचं नाव घेतलं जायचं. भाई ठाकूरसमोर कोणाचीही मान वर करून बोलायची हिंम्मत नव्हती. भाई ठाकूर यांनी बोट ठेवली ती मालमत्ता म्हणेल त्या दरात त्याला मिळायची. पण, जिकडे-तिकडे आपली मालमत्ता जमवणाऱ्या भाई ठाकूरला बिल्डर सुरेश दुबे चांगलाच नडला. भाई ठाकूरने मागितलेली मालमत्ता देण्यास त्यानं नकार दिला. भाई ठाकूरने सुरेश दुबेच्या एका प्लॉटवर कब्जा केला होता. दुबेने वकिलामार्फत भाई ठाकूरला नोटीस पाठवली.
हे ही वाचा >> Who is Rupali Barua: 60व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थीचं लग्न, दुसरी पत्नी अन् गुवाहटी कनेक्शन!
ठाकूर परिवाराची दहशत पाहून आपलं काय होणार हे दुबेला माहिती होतं. तरीही त्यानं हिम्मत दाखवली. घराबाहेर पडणं बंद केलं. शेवटी त्यानं आपल्या मूळ गावाला जायची तयारी केली. पण, दुबे नालासोपारा रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत पेपर वाचत बसले होते. हा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा ठरला आणि गोळ्या झाडून बिल्डर सुरेश दुबेंची हत्या करण्यात आली.