'आई व्हायचं नव्हतं..' न्यायाधीशाच्या सुनेचा मृत्यू; हत्या की आत्महत्या?

मुंबई तक

सासू आणि सासरा दोघेही निवृत्त न्यायाधीश, नवरा वकील..असं असतानाही सुनेनं आत्महत्या केली. आता ही आत्महत्या आहे की हत्या या अंगाने तपास सुरु झाला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

आई व्हायचं नव्हतं..

point

न्यायाधीशाच्या सुनेचा मृत्यू

point

हत्या की आत्महत्या?

Crime News : मध्य प्रदेशातील भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्विशा शर्मा असे मृत महिलेचे नाव असून, वर्षभरापूर्वीच तिचे लग्न भोपाळमधील वकील समर्थ सिंह यांच्याशी झाले होते. समर्थ यांचे कुटुंब न्यायालयीन सेवेशी संबंधित असून त्यांचे आई-वडील दोघेही निवृत्त न्यायाधीश आहेत. नोएडा येथून आलेल्या ट्विशाच्या माहेरच्या लोकांनी या प्रकरणी सासरच्या मंडळींवर छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून सखोल तपासाला सुरुवात केली आहे.

आत्महत्येपूर्वी भावाला फोन

मृत ट्विशाचा भाऊ मेजर हर्षित शर्मा हे भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. हर्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी ट्विशाने त्यांना फोन करून आपली व्यथा मांडली होती. पतीकडून सतत होणाऱ्या छळामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती आणि तिला भोपाळ सोडून परत माहेरी यायचे होते. तिने परतण्यासाठी रेल्वेचे तिकीटही बुक केले होते, मात्र त्यापूर्वीच तिने टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

हे ही वाचा : जावयाने सासरवाडीतच केलं कांड, मेहुण्याला दारु पाजली अन्..., नेमकं कारण काय?

'तिला आई व्हायचं नव्हतं'

ट्विशाच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, लग्नानंतर तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. लग्नानंतर तिने नोकरी सोडली होती. मात्र सासरच्या मंडळींकडून तिच्यावर नोकरी करण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात असे, ज्यातून घरात वाद होत असत. याशिवाय, मार्च महिन्यात ट्विशा प्रेग्नन्सी राहिली होती. त्यावेळी ती आई होण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती, परंतु सासरच्यांकडून तिच्यावर मुलासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावाही तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

हे ही वाचा : वृद्ध आई-वडिलांसह पुतण्या आणि पुतणीलाही संपवलं, 'त्या' एका कारणामुळे सगळं कुटुंब उद्ध्वस्त

कुटुंबियांची पोलीस आयुक्तांकडे धाव

या घटनेनंतर ट्विशाचे शवविच्छेदन एम्स भोपाळ येथे करण्यात आले असून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. संतप्त कुटुंबीयांनी भोपाळ पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आरोपींविरुद्ध तात्काळ एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा अत्यंत निष्पक्षपातीपणे आणि बारकाईने तपास करत आहेत. नवविवाहितेच्या मृत्यूच्या प्रकरणात सर्व पुराव्यांची कायदेशीर पडताळणी करावी लागते, त्यामुळे या प्रक्रियेत वेळ लागत असून लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
 

हे वाचलं का?