28 वर्षीय विधवा सुनेने केली सासऱ्याची हत्या, बलात्काराचा प्रयत्न केल्याचा दावा
एका 28 वर्षीय विधवा सुनेने सासऱ्याची हत्या केली आहे. सासऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून त्याचा खून केल्याचं सुनेनं सांगितलं. चेन्नईच्या पल्लवरम भागातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
28 वर्षीय विधवा सुनेने केली सासऱ्याची हत्या
बलात्काराचा प्रयत्न केल्याचा दावा
Crime News : एका 28 वर्षीय विधवा महिलेने तिच्या 58 वर्षीय सासऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (1 जुलै) पहाटे घडली. सासऱ्याने घरात एकटी पाहून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता, स्वतःच्या संरक्षणासाठी आपण हे पाऊल उचलल्याचा दावा या महिलेने केला आहे. पेरुमल असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मासे विक्रीचा व्यवसाय करायचा. तीन महिन्यांपूर्वीच आजारपणामुळे पतीचे निधन झाल्यानंतर ही महिला तिची आठ वर्षांची मुलगी, सासू आणि सासऱ्यासोबत राहत होती. चेन्नईतील पल्लवरम परिसरातील ही घटना आहे.
घरात सून एकटीच असताना...
प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, मृत पेरुमल हा गेल्या काही काळापासून सुनेवर अयोग्य टिप्पण्या करून आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून तिचा छळ करत होता. या छळाला कंटाळून महिलेने तिच्या सासूला या प्रकाराबाबत सांगितले होते, यामुळे सासू-सासऱ्यांमध्ये वाद होत होते. अशाच एका वादामुळे सासू काही दिवसांपूर्वीच नातेवाईकांकडे निघून गेली होती. त्यामुळे घरात महिला आणि तिची मुलगी पेरुमलसोबत एकट्याच होत्या.
हे ही वाचा : मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये व्यक्ती पडला, वाहून गेल्याची भीती व्यक्त
पहाटेच खोलीत शिरला
बुधवारी पहाटेच्या सुमारास पेरुमलने सुनेच्या खोलीत जबरदस्तीने प्रवेश केला, जिथे ती तिच्या मुलीसह झोपली होती. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महिलेने त्याला जमिनीवर ढकलले आणि घरात असलेले कोयता उचलून त्याचा गळा चिरला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : इस्लाम धर्म स्वीकार, गर्लफ्रेंडचा धर्मांतरासाठी दबाव, सांगलीतील तरुणाची आत्महत्या
स्वत:च शेजाऱ्यांना सांगितली घटना
या घटनेनंतर ती महिला हातात कोयता घेऊन घराबाहेर आली आणि तिने शेजाऱ्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सासऱ्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच आपण त्याला मारल्याचे तिने कबूल केले. तिने स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होण्याची इच्छा व्यक्त केली आणि शेजाऱ्यांना तिच्या मुलीची काळजी घेण्याची विनंती केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतले असून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









