संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT

दिल्लीत भेट तुला एके 47 ने उडवतो, असा धमकी देणारा मेसेज शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी पाठवला. धमकी देणाऱ्या व्यक्तीने लाँरेन्स बिष्णोईचा उल्लेख केलेला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणी संजय राऊत यांचे धाकटे भाऊ सुनील राऊत यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दुसरीकडे आरोपीची ओळख पटली असून, पोलिसांनी पुण्यातून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी बोलताना दिली. (Sanjay Raut life threat case : Police Detain Youth from Pune)
संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
संजय राऊत यांना जी धमकी आली आहे, त्यासंदर्भात व्यक्तीची ओळख पटलेली आहे. प्राथमिक रिपोर्ट असे आहे की, दारूच्या नशेत त्याने अशी धमकी दिली आहे. तथापि ही केवळ प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल, तरी कारवाई होईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली, तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होईल.
पुण्यातील तरुणाने दिली संजय राऊतांना धमकी; पोलिसांनी सांगितले नाव
पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी माध्यमांना आरोपीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “व्हॉट्सअपवर मेसेजद्वारे धमकी देण्यात आली. या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव राहुल उत्तर तळेकर आहे. त्याचे वय 23 वर्ष आहे. तो जालना जिल्ह्याचा मूळ रहिवासी असून, सध्या पुण्यात स्वतःचे हॉटेल चालवतो. त्याची चौकशी केली असता, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे समोर आले.”
हेही वाचा – Pawar कुटुंब कोणाला कधी समजलं नाही अन् समजणारही…, रोहित पवारांचं कोणाला प्रत्युत्तर?
“त्याने संजय राऊतांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही. नंतर मद्य प्राशन केल्यानंतर त्याने हा मेसेज पाठवला. त्याचा लाँरेन्स बिष्णोईशी कोणताही संबंध नाही. त्याने युट्यूबवर व्हिडीओ बघितला आणि त्यामुळे तसा उल्लेख केला. या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली जाईल आणि जे समोर येईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.