व्यसनमुक्ती केंद्रात उपचाराऐवजी मारहाण! रुग्णाने औषध घेण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांनी मिळून केली हत्या...
ही संपूर्ण घटना एका व्यसनमुक्ती केंद्रात घडली. याठिकाणी उपचार घेत असलेल्या एका 32 वर्षीय रुग्णाने औषध घेण्यास नकार दिल्यामुळे चार कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
व्यसनमुक्ती केंद्रात उपचाराऐवजी रुग्णाला मारहाण!
रुग्णाने ओषध घेण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांनी मिळून केली हत्या...
Crime News: गुजरातच्या सूरतमध्ये रुग्णावर उपचार करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही संपूर्ण घटना एका व्यसनमुक्ती केंद्रात घडली. याठिकाणी उपचार घेत असलेल्या एका 32 वर्षीय रुग्णाने औषध घेण्यास नकार दिल्यामुळे चार कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतला. पोलिसांनी आता चारही आरोपींना अटक केली असून अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन काउन्सिलर्स, एक वॉर्ड बॉय आणि एक ड्रायव्हर यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डुमास परिसरातील रेवा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रात घडली. सहाय्यक पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, धवल राठोड (32) यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या चार जणांमध्ये दोन काउन्सिलर्स, एक वॉर्ड बॉय आणि एक ड्रायव्हर यांचा समावेश आहे.
हे ही वाचा: बदलापूर : मोबाईल फोनमधील मॅसेज डिलीट झाला म्हणून 36 वर्षीय मुलाने जन्मदात्या आईचाच गळा आवळला...
कर्मचाऱ्यांची रुग्णाला बेदम मारहाण...
धवल राठोड यांना 28 फेब्रुवारी रोजी व्यसनमुक्ती उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, राठोड यांनी औषध घेण्यास नकार दिला, त्यानंतर केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. 1 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण, दुर्दैवाने तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
हे ही वाचा: Astrology: मार्च महिन्यात सूर्याचं तब्बल 3 वेळा संक्रमण; 'या' राशींचे लोक होतील मालामाल...
पोलिसांना धवलच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या आणि त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डोक्यावर, कंबरेत आणि शरीराच्या इतर भागांवर झालेल्या गंभीर जखमांमुळे पीडित राठोडचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात समोर आलं. पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची आणि इतर रुग्णांची सखोल चौकशी केली. औषध घेण्यास नकार दिल्यानंतर आरोपींचा राठोडशी वाद झाल्याचं उघडकीस आलं. त्यांनी त्याला काठ्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकरणात आरोपी जिग्नेश देसाई, रोहन संघानी, शैलेश वाघेला आणि दिलीप जोशी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खून आणि इतर गुन्ह्यांचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










