गणित विधानसभेचं: कोकण कोणाचं?, राणेंना ठाकरेंचं तगडं आव्हान
Vidhan Sabha Election 2024 Sindhudurg: महाराष्ट्रातील तळकोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 8 तालुके आणि सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली असे ३ विधानसभा मतदारसंघ आहेत. जाणून घेऊन नेमकं येथील राजकीय गणित कसं आहे.
ADVERTISEMENT

Vidhan Sabha Election 2024: माधवी देसाई, मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना आता अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मुंबई Tak आपल्यासाठी खास 'गणित विधानसभेचं' ही विशेष सीरिज घेऊन आलोय. आजच्या या भागात आपण कोकणाचा आढावा घेणार आहोत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील तळकोकणातला गोवा सीमेलगतचा शेवटचा जिल्हा. या जिल्ह्यात ८ तालुके आणि सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली असे ३ विधानसभा मतदारसंघ आहेत. सिंधुदुर्गाचं राजकारण सध्या एकाच बड्या नेत्याभोवती फिरतं. ते म्हणजे माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजप खासदार नारायण राणे.
लोकसभेला त्यांची ताकद सिद्ध केलीय. मात्र, विधानसभेला ही लढाई थेट नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच होणार. जिल्ह्यातील या तिन्ही विधानसभा मतदारसंघात ताकद कुणाची, विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक कोण आहेत? महाविकास आघाडी की महायुती कोणाचं पारडं जड आहे याच गोष्टींची उत्तरं जाणून घेऊयात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेचं गणित
मालवण, वेंगुर्ल्यातील निळेशार अद्भुत समुद्रकिनारे ते आंबोलीसारखं नयनरम्य थंड हवेचं ठिकाण ते सावंतवाडी, दोडामार्गचा आंबे- काजू- फणस- नारळ सुपारीच्या बागांनी बहरलेला पट्टा अशी विविधता या मतदारसंघांत दिसते. बागायतदारांचे, मच्छिमारांचे प्रश्न, अनेक दुर्गम गावातील रस्त्यांची दुर्दशा, दळणवळणाची अपुरी साधनं, पाणी- वीज अशा महत्वाच्या गोष्टींची वाणवा हे इथल्या मतदारांसाठी महत्वाचे मुद्दे आहेत.
हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : भाजपने उमेदवारी दिलेले अमित गोरखे कोण?
सुरवातीला पाहूयात सावंतवाडी मतदारसंघाचं गणित. सावंतवाडीत महायुतीकडून विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. केसरकर यंदा चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरतील. राष्ट्रवादी ते शिवसेना आणि बंडानंतर शिंदेंची साथ असा केसरकरांचा प्रवास राहिलाय. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा राणेंच्या विजयात मोलाचा वाटा होता. सावंतवाडीत राणेंना 85,312 मतं पडली. तर, विनायक राऊतांना 53,593 मतं पडली. इथून राणेंना ३१ हजारांहून अधिक मताधिक्य मिळालंय. केसरकरांनी जुनं वैर विसरुन केलेल्या या मदतीची राणेंना विधानसभेला परतफेड करावी लागेल. त्यामुळे, यावेळी राणेंची ताकद ही केसरकरांसाठी जमेची बाजू असेल.