
यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी येथील महागाव येथे गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. गणपती पाण्यात नीट बुडाला की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा पाण्यात गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान बबनराव गावंडे अशी मृत मुलांची नाव आहेत. या घटनेने असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी दोन जण आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते.गणपती विसर्जन केल्यानंतर ते घरीही परतले. पण गणपती पाण्यात बुडाला की नाही हे पाहण्यासाठी दोघेजण पुन्हा नाल्यावर गेले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेजण नाल्यात बुडाले. दोघांना तात्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी २० मिनिट दोन्ही मुलांना बघितलेच नाही,ऑक्सिजन लावले नाही. डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळे आमच्या मुलांचे मृत्यू झालआ असा गंभीर आरोपी मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, पनवेलमधील विसर्जन घाटावर मोठी दुर्घटना घडली आहे. पनवेलच्या कोळीवाडा गणेश विसर्जन घाटावरती जनरेटरमधील वायर तुटून तब्बल 11 जणांना विजेचा धक्का बसला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर पनवेलच्या लाईफ लाईन आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. यात एका ९ महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे.
पनवेलमधील वडघर कोळीवाडा विसर्जन घाटावर भाविकांसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र जोरदार पाऊसामुळे जनरेटरची एक वायर तुटून एका तरुणाच्या अंगावर पडली आणि त्याला शॉक लागला. त्यावेळी त्याला मदत करण्यासाठी कुटुंबीयांनीही संबंधित तरुणाला स्पर्श केला. त्यामुळे कुटुंबीयांनाही विजेचा धक्का बसला.