पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याप्रकरणी भास्कर जाधवांची बिनशर्त माफी, फडणवीसांचं चॅलेंजही स्वीकारलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्या प्रकरणी सभागृहात बिनशर्त माफी मागितली आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यावरून विधानसभेत राडा झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व आमदारांनी भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसंच भास्कर जाधव माफी मागायला तयार नसतील तर त्यांचं निलंबन करण्यात यावं अशीही मागणी केली. गदारोळ इतका वाढला होता की कामकाज दुपारी दोन पर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. त्यांनी हे सांगितलं की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो योग्यच आहे. कुठल्याही पक्षाचे नेते असतील त्यांची नक्कल किंवा त्यांच्याबद्दल असंसदीय शब्द, वर्तन हे होता कामा नये. यानंतर भास्कर जाधव बोलायला उभे राहिले. भास्कर जाधव म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी शब्दच्छल केला होता. तेच मी सांगत होतो. मी ज्यावेळी बोलत असतो तेव्हा कधी कधी अंगविक्षेप माझ्याकडून होतो. आजही तो झाला, त्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. तसंच देवेंद्र फडणवीस जो काही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहेत त्याला सामोरा जायला मी तयार आहे असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं सभागृहात?

हे वाचलं का?

विधानसभेत राज्यातील वीज कनेक्शन कापणीसंदर्भातील धोरणावर चर्चा सुरू असताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका विधानाचा संदर्भ दिला. ‘पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ५० लाख जमा करणार असं म्हटलं होतं, ते केले नाहीत’, असं राऊत म्हणाले. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेत राऊतांना आव्हानच दिलं.

‘मी आव्हान देतो की नितीन राऊतांनी पंतप्रधानांनी असं म्हटल्याचं वाक्य आणून दाखवावं नाहीतर देशाची माफी मागावी. या सभागृहात नसणाऱ्यांविषयी बोलायचं नसतं कारण ते उत्तर देण्यासाठी इथे नसतात असा नियम आहे. वाट्टेल ते बोलायचं हे चालू देणार नाही. आम्ही तुमच्या नेत्याबद्दल बोलू का? हे कामकाजातून काढा’, असं फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

दरम्यान, यावर बोलताना नितीन राऊतांनी 2014 च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा केल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं. यावर देखील आक्षेप घेत देवेंद्र फडणवीसांनी मोदी असं म्हटलेच नसल्याचा दावा केला.

ADVERTISEMENT

यानंतर भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत मोदींची नक्कल केली. ‘2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी 100 वेळा म्हणाले आहेत की ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का’ असं ते बोलले आहेत’, असं भास्कर जाधव नक्कल करत म्हणाले.

ज्यानंतर सगळा गदारोळ सुरू झाला. तसंच भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी एकमुखी मागणी भाजपचे खासदार करू लागले. कामकाज तहकूब झाल्यानंतर जेव्हा वीस मिनिटांनी सभागृह सुरू झालं तेव्हा भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली आणि देवेंद्र फडणवीस यांचं आव्हानही स्वीकारलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT