पत्नीचं तंबाखूचं व्यसन हे घटस्फोटाचं कारण असू शकत नाही-कोर्ट
पत्नीचं तंबाखूचं व्यसन हे घटस्फोटाचं कारण असू शकत नाही असं एका खटल्याचा निकाल देताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने म्हटलं आहे. जस्टिस ए. एस चांदूरकर आणि जस्टिस पुष्पा गनेडीवाला यांनी एका घटस्फोटाच्या प्रकरणात हा निर्णय दिला आहे. पत्नीला तंबाखू खाण्याचं व्यसन आहे त्यामुळे तिच्या पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज फेटाळून लावण्यात आला […]
ADVERTISEMENT

पत्नीचं तंबाखूचं व्यसन हे घटस्फोटाचं कारण असू शकत नाही असं एका खटल्याचा निकाल देताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने म्हटलं आहे. जस्टिस ए. एस चांदूरकर आणि जस्टिस पुष्पा गनेडीवाला यांनी एका घटस्फोटाच्या प्रकरणात हा निर्णय दिला आहे. पत्नीला तंबाखू खाण्याचं व्यसन आहे त्यामुळे तिच्या पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
नागपूरमध्ये 15 जून 2003 ला बौद्ध धर्मातील प्रथेप्रमाणे या दोघांचं लग्न लग्न झालं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगीही झाली. मात्र कौटुंबिक मतभेदांमुळे हे जोडपं वेगळं राहू लागलं. मुलगी वडिलांसोबत आणि मुलगा आईसोबत राहू लागला. या सगळ्यानंतर महिलेच्या पतीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली. त्याने घटस्फोट मिळावा म्हणून एक याचिका कोर्टात दाखल केली ज्यात त्याने हे म्हटलं आहे की माझी पत्नी ही घरकाम करत नाही, घर नीट सांभाळत नाही, माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबीयांसोबत ती कायम वाद घालत असते, भांडण करत असते. तिला माझ्या कुटुंबीयांपासून त्रास होतो म्हणून आम्ही घरही घेतलं. मात्र तिथेही आमच्यात सतत खटके उडू लागले. ती नीट वागत नव्हती. माझी संमती न घेता ती माहेरी जात होती तिथे पंधरा पंधरा दिवस रहात होती असंही या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. तिला तंबाखू खाण्याची सवय आहे. तिच्या पोटात तंबाखू खाल्ल्याने गाठही झाली होती, तिच्या औषध उपचारांसाठी आणि ट्रिटमेंटसाठी बराच खर्च झाला असंही त्याने म्हटलं आहे.
काय आहे बायकोचं उत्तर ?
माझा नवरा आणि माझी सासू माझा मानसिक आणि शारिरीक छळ करत असल्याचं या महिलेने कोर्टाला सांगितलं. माझ्या माहेरच्यांकडे माझ्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी टू व्हिलरची मागणीही केली होती. ती पूर्ण केली नाही म्हणून मला माझ्या सासूने शिव्या दिल्या आणि नवऱ्याने मारहाण केली. मी घर सोडून जावं यासाठी माझा सातत्याने छळ करण्यात आला. याविरोधात मी पोलिसात तक्रारही केली आहे. यासंदर्भातल्या नोंदीही महिलेने सादर केल्या.
2015 लाही या प्रकरणी पत्नीपासून घटस्फोट मिळावा म्हणून तिच्या पतीने कोर्टात अर्ज केला होता. मात्र दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने घटस्फोट देण्यास नकार दिला. त्यानंतर या महिलेच्या पतीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा दरवाजा ठोठावला. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानेही हा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला आहे.