काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम?
काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आशिष देशमुख भाजपमधून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अजूनही विरलेली नाही. अशातच नागपुरातले काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांची भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. देशमुखांच्या निवासस्थानी सुमारे तासभर ही भेट झाली. यानंतर आशिष देशमुखांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. देशमुखांच्या माध्यमातून भाजपला काय साधायाचंय? देशमुखांच्या माध्यमातून भाजपला कोणाला रोखायचंय हेच जाणून घेऊयात.
देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौरा केला. तिथून आल्यानंतर त्यांनी आशिष देशमुखांची भेट घेतली. ‘सावनेरमध्ये तुमच्यातलाच एक लढणार’ असं विधान फडणवीसांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीसांचं हे विधान सुचक असल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतरच देशमुख आणि फडणवीस ही भेट झाल्याने आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर सावनेरमधून निवडणूक लढवतील असा अर्थ काढण्यात येतोय.
आशिष देशमुख यांनी या भेटीबद्दल बोलताना सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस हे नाश्त्यासाठी माझ्याकडे आले होते. 2019 ला मी त्यांच्याविरोधात लढलो होतो. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. काल जे विरोधक होते, ते आज मित्र असतात. याचसाठी फडणवीसांसोबत भेट झाली.”
हेही वाचा >> Aryan khan case : महागडी घड्याळं, परदेशी वाऱ्या; समीर वानखेडेंविरोधात काय सापडलं?
भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर देशमुख म्हणाले, “असं काही नाही. मी काँग्रेसमध्येच आहे. मला दिलेल्या नोटीसचं सविस्तर उत्तर मी दिलं आहे. मला खात्री आहे की, काँग्रेस मला काढणार नाही. पण, पक्षविरहित राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे देवेंद्रजींशी कौटुंबिक संबंध आहे म्हणून ते आले होते.”