‘राष्ट्रवादीला पॅक करून पाठवून द्या’, देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला
महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले. तर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीत सभा घेतली म्हणून नाराजी व्यक्त केली.
ADVERTISEMENT

साडेतीन जिल्ह्यांतील पक्ष म्हणून टोला लगावत उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत आहे. फडणवीसांची भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या सभेबद्दल शरद पवार यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची निपाणी येथे सभा झाली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार इथे (निपाणी) आहे. इथे येऊन हा पक्ष काय डोंबलं करणार आहे? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ”, अशी टोलेबाजी फडणवीसांनी केली.
फडणवीसांच्या निपाणीतील सभेबद्दल शरद पवार काय म्हणालेले?
“देवेंद्र फडणवीस कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला गेले ही बाब चांगली नाही. सीमाभागातील लोकांनी खूप सोसलं आहे. त्यांना जर समजले की महाराष्ट्र त्यांच्या बाजूने नाही तर त्याला अतीव दुःख होईल”, असं पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले.
हेही वाचा >> ‘खरे मर्द कोण?’, शरद पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर ‘सामना’त स्फोटक अग्रलेख
कर्नाटकात कुणाचं सरकार येणार? पवार म्हणाले…
शरद पवार यांनी कर्नाटकामध्ये कुणाचं सरकार येणार याबद्दलही मोठं विधान केलं. “कर्नाटकात देखील काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे समजते. देशात अनेक राज्यांमध्ये बिगर भाजप पक्षाचे सरकार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय होईल हे सध्या सांगता येणार नाही”, असं ते म्हणाले.










