‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि नवा पायंडा सुरू झाला’, फडणवीसांनी काढला इतिहास
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर असमान निधी वाटप केल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT

Maharashtra monsoon session 2023 : निधी वाटपाचा मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याच मुद्द्यावरून सरकारला सवाल केला. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारपासून राज्यात नवा पायंडा पडला, असा दावा फडणवीसांनी केला. ते नेमकं काय म्हणाले?
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर असमान निधी वाटप केल्याचा आरोप केला. “आमदारांना असमान निधीवाटप सरकारकडून करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की, निधीचं असमान वाटप झालेलं नाही. आधीच्या सरकारने ज्या कामांना मंजुरी दिली होती, त्या कामांवरील स्थगिती अजूनही तशीच आहे. हा निधी सरकारच्या तिजोरीतून दिला जातो. जनतेकडून येणाऱ्या कराच्या पैशातून दिला जातो. सरकारची यावर मालकी नाही. ज्या मतदारसंघांमध्ये निधी दिला नाही, त्या मतदारसंघातील जनता कर भरत नाहीये का? त्यांना विकासाचा अधिकार नाहीये का? एखाद्या आमदाराला 50 कोटी, एखाद्याला 60 कोटी दिले जातात आणि दुसरीकडे एखाद्या आमदाराला 2 कोटी सुद्धा दिले जात नाही. यावर सरकारने खुलासा केला पाहिजे”, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडली. त्यानंतर आमदार भाई जगताप, आमदार सचिन अहिर यांनीही अशाच आशयाचं भाष्य केलं.
विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “निधी वाटपासंदर्भात आपल्याकडे प्रस्ताव येतात. त्या प्रस्तावांवर विभाग ईपीसी तयार करतं. ती ईपीसी प्रत्येक विभागाकडून आलेल्या प्रस्तावांवर त्यातील किती समाविष्ट होऊ शकतात, किती पैसे आहेत, किती खर्च केलाय… या आधारावर त्याला मान्यता दिली जाते.”
वाचा >> ‘रोहित पवारांचं आंदोलन’, अजित पवारांनी टोचले कान, उदय सामंतांची मध्यस्थी यशस्वी
“एक ईपीसी वित्त मंत्र्यांकडे होते आणि मग बजेट किंवा मागण्या अंतिम होत असतात. या सगळ्या प्रक्रियेत आलेले सगळे प्रस्ताव मंजूर होतातच असं नाही, त्यातील बरेचसे मंजूर होतही नाही. आता मूळात जो मुद्दा मांडला गेला आहे. मला दुर्दैवाने थोडं इतिहासात जावं लागेल. ते याकरिता की, पाच वर्ष मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. या पाच वर्षात एकदाही अशी चर्चा या सभागृहात झाली नाही. कारण या राज्याची तशी परंपराही नव्हती”, असं फडणवीसांनी सभागृहात सांगितलं.