Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी महाराष्ट्रात 'हाच' मार्ग का निवडला?

bharat jodo yatra in maharashtra : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मराठवाडा, विदर्भातूनच का जातेय?
rahul gandhi in bharat jodo yatra
rahul gandhi in bharat jodo yatra

केरळातून सुरू झालेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून आस्ते कदम पुढे निघालीये. ही यात्रा तब्बल १६ दिवस महाराष्ट्रात असणार आहे. मराठवाड्यातून प्रवेश करून विदर्भामार्गे ही यात्रा मध्य प्रदेशात प्रवेश करेल. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांतून ही जातेय. पण, राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातला हाच मार्ग का निवडला? या पाच जिल्ह्यातूनच ही यात्रा का जातेय? राहुल गांधींना कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करायचा होता, तर सोलापूर जिल्ह्यातूनही करू शकत होते. पण, त्यांनी नांदेडमधील देगलुरच का निवडलं? महाराष्ट्रातील या मार्गाचं राजकीय महत्वं काय? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा आढावा...

राहुल गांधींनी निवडलेली राज्य पाहिली तर त्यात उत्तर प्रदेश (यूपी), बिहारचा समावेश नाही. या यात्रेत दक्षिणेतील राज्य असू देत किंवा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान... ही राज्य. त्यांच्या यात्रेचा मार्ग पाहिला, तर जिथं काँग्रेसचं अजूनही अस्तित्व आहे, तेच राज्य या यात्रेसाठी निवडण्यात आलेत. ही यात्रा राजकीय नाही, असं काँग्रेस नेते सांगत असले तरी ही २०२४ च्या लोकसभेची तयारी असल्याचं बोललं जातंय.

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना काँग्रेस नेते राहुल गांधी.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना काँग्रेस नेते राहुल गांधी.

भारत जोडो यात्रा : राजकीय समीकरणं

महाराष्ट्रात २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशात राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील यात्रेचं राजकीय महत्वं काय? त्यांनी मराठवाडा आणि विदर्भाची निवड का केली? हे प्रश्न उपस्तित होणं साहजिकच आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली, तर लोकसभेच्या एकूण जागा आहेत ४८. यात फक्त एकमेव खासदार हा काँग्रेसचा आहे आणि तोही दिलाय विदर्भानं!

दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेचा विचार केला, तर २८८ पैकी ४४ जागा काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत. त्यात तब्बल २३ आमदार हे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ज्या दोन महत्त्वाच्या प्रदेशातून म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातून जातेय त्या विभागातले आहेत. यात विदर्भातील १५, तर मराठवाड्यातल्या ८ आमदारांचा समावेश आहे.

भारत जोडो यात्रेत हात उंचावून प्रतिसाद देताना राहुल गांधी.
भारत जोडो यात्रेत हात उंचावून प्रतिसाद देताना राहुल गांधी.

भारत जोडो यात्रेच्या मराठवाडा आणि विदर्भातल्या मार्गाचा अर्थ काय?

महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भानं ७ मुख्यमंत्री राज्याला दिले, जे काँग्रेसमधले आहेत. एकीकडे काँग्रेस संपली असा दावा वारंवार होत असताना, या दोन विभागात काँग्रेसचं अस्तित्व अजूनही आहे. पण, या दोन्ही विभागात काँग्रेस काही प्रमाणात कमकुवत झालेली दिसते. कारण २००९ ला या फक्त दोन्ही विभागातून काँग्रेसचे तब्बल ४२ आमदार निवडून आले होते. २०१४ च्या मोदी लाटेपासून जी काँग्रेसची ताकद कमी झालेली दिसते ती भरून काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी या यात्रेचा फायदा होण्याची शक्यता आहे.

आता आणखी एक प्रश्न म्हणजे राहुल गांधींनी देगलूरमधूनच महाराष्ट्रात प्रवेश करायचं का ठरवलं? तर नांदेड हा आधीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. २०१४ ला देशात सर्वत्र मोदी लाट असताना अशोक चव्हाणांनी नांदेडात काँग्रेसचा झेंडा झडाकावत ठेवला.

विधानसभेचा विचार केला, तर काँग्रेसचे आताही तीन आमदार नांदेड जिल्ह्यात आहेत. ज्या देगलूरमधून राहुल गांधींची यात्रा येतेय, त्या मतदारसंघातही काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आमदार आहेत. पण, २०१९ च्या लोकसभेतला अशोक चव्हाणांचा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का होता. त्यामुळे इथं काँग्रेसला आणखी उभारी देण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी देगलूरमार्गे प्रवेश करून नांदेडमध्ये सभा घेण्याचं ठरवलंय असावं, असं म्हटलं जातंय.

नांदेडनंतर राहुल गांधी हिंगोलीत जातील. पण, हिंगोलीतही काँग्रेसला काही प्रमाणात का होईना आपली मूळ बळकट करण्याची संधी आहे. हिंगोलीतून राहुल गांधींची यात्रा विदर्भात जाणारेय. विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांची निवड राहुल गांधींनी केलीये.

काँग्रेसचा राज्यातला इतिहास बघितला, तर विदर्भात काँग्रेसचा प्रभाव जास्त राहिलेला आहे. अगदी काँग्रेसच्या स्थापनेपासून विदर्भानं काँग्रेसला भरभरून मत रुपी पाठिंबा दिलाय. संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवारही विदर्भाचे होते.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी गुरुद्वाराला भेट दिली.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी गुरुद्वाराला भेट दिली.
आता २०१४ चा अपवाद वगळता विदर्भ नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलाय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण भारतात काँग्रेसचा सुफडा साफ झाला होता. महाराष्ट्रासारखे मोठे राज्य काँग्रेसनं गमावलं होतं. त्यातही विदर्भानं काँग्रेसची लाज राखली. महाराष्ट्रातून काँग्रेसला बाळू धानोरकर यांच्या स्वरुपात एक खासदार मिळाला आणि तोही विदर्भाचा.

इतकंच नाहीतर आणीबाणीनंतरही लोकसभेच्या ज्या निवडणुका लागल्या होत्या, त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात वातावरण असतानाही विदर्भ इंदिरा गांधींच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिलाय... सध्याचा विचार केला तर विदर्भातून काँग्रेस १५ आमदार आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघ असेल वा जिल्हा परिषद... अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काँग्रेसचं वर्चस्व कायम राखलंय. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विदर्भातून तब्बल ६२ आमदार विधानसभेवर जातात. २००९ ला २४ आमदार एकट्या विदर्भानं काँग्रेसला दिले होते. पण, आता काँग्रेसची ही ताकद कमी होताना दिसतेय. भाजपनं काँग्रेसच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावलाय. त्यामुळे इथंही काँग्रेसला उभारी देण्याची गरज असल्याचं वारंवार बोललं गेलंय.

राहुल गांधींची यात्रा ज्या मार्गानं जातेय, त्याच मराठवाडा आणि विदर्भानं महाराष्ट्रात काँग्रेसला नेहमी साथ दिलीय. इथं अजूनही काँग्रेसचं अस्तित्व आहे. फक्त आता त्याला बूस्ट देण्याची गरज आहे, असं म्हटलं जातं.

भारत जोडो यात्रेत संवाद साधताना राहुल गांधी.
भारत जोडो यात्रेत संवाद साधताना राहुल गांधी.

राहुल गांधींच्या यात्रेमुळे आता हे काँग्रेसचे बालेकिल्ले त्यांना परत मिळतील का? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जो काँग्रेसचा सुफडासाफ झाला होता, तो भरून काढण्यात काँग्रेसला यश येईल का? विदर्भ आणि मराठवाड्यातून काँग्रेसला जसा प्रतिसाद मिळतोय, तो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळेल का? याची उत्तरं आगामी निवडणुकीतून मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in