MP Election: भाजपचं ‘बंगाल पॅटर्न’! केंद्रीय मंत्री, खासदारांना का दिली विधानसभेची तिकीटं?
भाजपने यापूर्वी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग केला होता. 2022 मध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना करहल मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या विरोधात उभे केले होते.
ADVERTISEMENT

MP election 2023 Explained in marathi : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्य प्रदेश निवडणुकीसाठी उमेदवारांची जाहीर केली. यामध्ये 39 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपच्या या यादीत तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांचीही नावे आहेत. भाजपने नरसिंगपूरमधून प्रल्हाद सिंग पटेल यांना त्यांचे भाऊ जलम सिंग पटेल यांच्या जागी तिकीट दिले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-१ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. पण, भाजपचं हे धक्कातंत्र काय आणि मध्य प्रदेशात बंगाल पॅटर्न नेमका काय, हेच समजून घ्या.
राज्याच्या निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री आणि खासदारांना उतरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. भाजपने यापूर्वी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग केला होता. 2022 मध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना करहल मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या विरोधात उभे केले होते. बघेल निवडणूक हरले, पण त्यांनी अखिलेश यांना तगडे आव्हान दिले होते.
त्रिपुरामध्ये केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांनीही विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. बघेल आणि भौमिक यांनी केंद्रात त्यांची मंत्रीपदे कायम ठेवली आहेत.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही भाजपने बाबुल सुप्रियो यांच्यासह खासदार लॉकेट चॅटर्जी आणि निशीथ प्रामाणिक यांच्यासह पाच खासदारांना उमेदवारी दिली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, लॉकेट चटर्जी आणि राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचा पराभव झाला होता.