Praful Patel: NCP चा निकाल ‘या’ दिवशी खरंच लागणार?, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
NCP and Election Commission: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दावा केला की 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याचा निकाल लागेल. मात्र, खरंच निवडणूक आयोग 30 सप्टेंबरपर्यंत निकाल देऊ शकतं का हे आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

NCP Party and Election Commission: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) निवडणूक आयोगाकडील फैसला हा 30 सप्टेंबरच्या आसपास येण्याची शक्यता आहे, आणि तो 100 टक्के अजित पवारांच्या (Ajit Pawar) बाजूने येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी केला आहे. पण 30 सप्टेंबरला अवघे 32 एक दिवस राहिले आहेत, अशात निवडणूक आयोग राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय घेऊ शकतो का? निवडणूक आयोगाला पक्षांच्या वादांमध्ये निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असते का? याआधी काय घडलंय हे आपण सविस्तपणे जाणून घेऊयात. (praful patel claims ncp party decision will be taken on september 30 latest political news maharashtra)
1999 ला स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर याआधीही ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे, पण आता मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवारांनीच राष्ट्रवादीवर दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढवू हे आधीच जाहीर केलं आणि भाजपसोबत सत्तेत जाण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांनाही हटवलं आहे.
निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार?
30 जूनला अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीमध्येच शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवलं, आणि कार्यकारिणीच्या संमतीने अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं. विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून जयंत पाटलांना हटवलं आणि अजित पवारांना गटनेता केलं. शिवसेना बंडावेळी ज्या चुका झाल्या त्या टाळण्यासाठी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी हे सगळं करवून घेतलं.
आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही अजित पवार आणि गटनेताही अजित पवार, अशात राष्ट्रवादी पक्षाच्या संमतीने आणि गटनेत्याच्या पत्रामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपसोबत जायला पाठिंबा असल्याचं विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांना दाखवण्यात आलं.