कराडच्या Encounter चा दावा, EVM मशीन आणि मुंडेंवर खळबळजनक आरोप करणारा पोलीस रणजीत कासलेची A to Z माहिती
मुख्यमंत्री फडणवीस, धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोप करणारा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याला आता बीड पोलिसांनी अटक केली आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

पुणे: माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेला आज (18 एप्रिल) अटक करण्यात आली आहे. पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे बीडमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
नेमकं प्रकरण काय?
रणजीत कासले हा बीड पोलीस दलाच्या सायबर गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून आपल्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि व्हिडिओद्वारे सातत्याने धक्कादायक खुलासे करत होता.
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा दावा
कासले याने दावा केला होता की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरसाठी त्याला 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. त्याने ही ऑफर धनंजय मुंडे यांच्याशी जोडली होती. कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोपही त्याने केला होता.
विधानसभा निवडणूक आणि पैसे
कासले याने असा खळबळजनक दावा केला की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा करण्यात आले होते. हे पैसे त्याला EVM मशीन असलेल्या स्ट्राँग रूमपासून दूर राहण्यासाठी देण्यात आले होते. यापैकी साडेसात लाख रुपये त्याने परत केल्याचेही तो म्हणाला होता. त्याने धनंजय मुंडे यांच्यावर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप केला आहे.










