Maratha Reservation : “जरांगे ऐकत नाही म्हणल्यावर…”, छगन भुजबळांच्या विधानाने खळबळ
Maratha Reservation Chhagan Bhujbal Manoj Jarange Patil : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे.
ADVERTISEMENT

Chhagan Bhujbal Manoj Jarange Patil : मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीने मराठा विरुद्ध ओबीसी हा जातसंघर्ष उभा राहिला आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्याविरुद्ध आवाज उठवताना मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि सरकारच्याच भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. समितीकडून आलेले आकडे आणि सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत ठेवलेल्या आकडेवारीबद्दल भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
ओबीसीतील काही जाती वगळण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टात सुनावणीसाठी आली आहे. यासाठी भुजबळ कोर्टात गेले होते. मात्र याचिकेवरील सुनावणी वेळ असल्याने ते मंत्रिमंडळ बैठकीला निघून गेले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणावर स्पष्टपणे मत मांडलं.
ओबीसी आरक्षण याचिका, भुजबळांनी काय सांगितलं?
भुजबळ म्हणाले, “२०१८ साली मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी केस दाखल केली. सध्या ओबीसीमधील जे लोक आहेत, मग तेली, माळी, वंजारी असे… त्यांचा बेकायदेशीरपणे ओबीसीमध्ये समावेश केलेला आहे. त्याचा पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे आणि तोपर्यंत त्यांचे ओबीसी आरक्षणाचे लाभ थांबण्यात यावेत, अशी याचिका दाखल केलेली आहे. आता त्यांनी केस पुन्हा सुनावणीसाठी मेन्शन केली.”
हे ही वाचा >> “…तर फडणवीसांच्या थेट गळ्यातच पडतो”, जरांगे पाटील काय म्हणाले?
“ज्यांना खरंतर कायदेशीरपणे आरक्षण देऊ शकत नाही, अशा काही लोकांनी कुणबी जात प्रमाणपत्र घ्यायचं आणि ओबीसीमध्ये यायचं. दुसऱ्या बाजूला जे ओबीसीमध्ये आहेत, त्यांना हायकोर्टात लढून ओबीसीमधून बाहेर ढकलायचं, असा हा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरू आहे. आम्ही पण यावर लक्ष ठेवून आहोत”, असे भुजबळ यावेळी म्हणाले.