हसन मुश्रीफांना दिलासा, 'त्या' प्रकरणातून निर्दोष मुक्त होणार? कोर्टात काय घडलं? वाचा सविस्तर...
संताजी घोरपडे कारखान्यात शेअर्स देण्याचं आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसवल्याप्रकरणी मुश्रीफांवर गुन्हा दाखल झाला होता. मुरगुड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ADVERTISEMENT

Hasan Mushrif : महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपाखाली मुश्रीफांविरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी सी समरी रिपोर्ट अर्थात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे आता मुश्रीफांचा निर्दोष मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जातंय.
बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी ही माहिती दिली. अतिरिक्त सरकारी वकील आशिष सातपुते यांनी न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश एस. पाटील यांच्या खंडपीठाला सांगितलं की, पोलिसांनी ऑक्टोबर 2023 मध्येच हा अहवाल दाखल केला होता.
हे ही वाचा >> 6 वर्षाच्या चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडले, दाताने धरून फरफटत नेलं, थरकाप उडवणारा CCTV
ही माहिती मिळाल्यानंतर न्यायालयाने मंत्री हसन मुश्रीफ यांचे वकील आबाद पोंडा आणि प्रशांत पाटील यांना सांगितलं की, जेव्हा सी समरी रिपोर्ट दाखल केला जातो, तेव्हा त्यांच्या याचिकेत काहीही शिल्लक राहत नाही.
सी-समरी रिपोर्ट म्हणजे काय?
सी समरी रिपोर्ट म्हणजे असा अहवाल ज्यामध्ये पोलिस असा निष्कर्ष काढतात की, प्रकरण पूर्णपणे खरं किंवा पूर्णपणे खोटं नाही. सहसा जेव्हा तथ्यांमध्ये चूक असते किंवा प्रकरण दिवाणी स्वरूपाचं असतं तेव्हा असं घडतं. हा अहवाल मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केला जातो, खटला बंद करायचा की पुढील तपास करायचा हे यावरुन ठरतं.