Barsu Refinery : हजारो महिलांचं रस्त्यावर झोपून आंदोलन, रिफायनरीचा वाद काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

In Rajapur, Barsu, Solgaon, the thousands of local women and men oppose to proposed refinery
In Rajapur, Barsu, Solgaon, the thousands of local women and men oppose to proposed refinery
social share
google news

Barsu Refinery :

रत्नागिरी : येथील राजापूर, बारसू, सोलगावमध्ये या भागात प्रस्तावित रिफायनरीविरोधात वातावरण तापलं आहे. ही रिफायनरी कोकणातून हद्दपार करण्यासाठी पुन्हा एकदा हजारो स्थानिक महिला आणि पुरुष रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारपासून या रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षणाची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिफायनरी विरोधी आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. माती सर्वेक्षण होऊ नये यासाठी महिलांनी रस्त्यावरच झोपयला सुरुवात केली आहे. जोपर्यंत कोकणातून प्रकल्प रद्द होत नाही, माती सर्वेक्षण थांबत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलक महिलांनी घेतली आहे. (In Rajapur, Barsu, Solgaon, the thousands of local women and men oppose to proposed refinery)

या पार्श्वभूमीवर हा सगळा वाद नेमका काय आहे, स्थानिकांचा विरोध का आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करु.

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफाईन करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासन या प्रकल्पासाठी आग्रही असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे सदर प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर, नाटे या परिसरात नियोजित आहे. आधी हा प्रकल्प नाणारमध्ये प्रस्तावित होता. मात्र नाणार परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्यास ग्रामस्थांकडून विरोध केला गेला. त्यानंतर आता शासनाकडून बारसू-सोलगाव परिसरामध्ये त्याची उभारणी करण्याची चाचपणी सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Barsu Refinery : ‘आधी बोंबाबोंब, अन् नंतर…’, उद्योगमंत्री उदय सामंत ठाकरेंवर चिडले

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प बारसू, गोवळ, धोपेश्वर, नाटे या परिसरातील 3 हजार 400 एकर जमिनीवर होणार आहे. या प्रकल्पासाठी माती परिक्षण आणि इतर चाचण्या करण्यासाठी 84 कूपनलिका खोदायच्या आहेत. तसेच क्रूड टर्मिनलसाठी साठी 501 एकर जमीन लागणार आहे. ही जमिन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. या प्रकल्पातून कोकणाच्या विकासाला मोठा हातभार लागेल, उद्योग वाढतील असा शासनाचा दावा आहे. मात्र स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. ग्रामपंचायतीने प्रकल्पविरोधी ठराव मंजूर केला असतानाही शासन हा प्रकल्प का रेटत आहे, असा सवाल स्थानिकांनी विचारला आहे.

का होत आहे विरोध?

कोकणाला निसर्गाने भरभरुन दिलं आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा ही कोकणची संपत्ती आहे. मात्र रिफायनरीमुळे ही संपत्ती धोक्यात येईल, अशी स्थानिकांची भूमिका आहे. याशिवाय कोकणातील रहिवाशांचा मासेमारी हा प्रमुख रोजगार आहे. मात्र रिफायनरीमुळे समुद्रात गरम पाणी आणि आणखी काही घटक सोडले जातील यामुळे मासेमारीवर परिणाम होईल, जैवविविधतेवर धोका निर्माण होईल आणि याचा कोकणाच्या अर्थचक्रावर परिणाम होईल. शिवाय या प्रकल्पामुळे आपल्या जमिनी धोक्यात येतील, अशा काही प्रमुख कारणांमुळे कोकणात नाणार पाठोपाठ बारसू, सोलगावमध्येही रिफायनरी प्रकल्पाचा विरोध होत आहे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या सुट्टीवर? अचानक सुट्टीमागचं कारण काय?

माती सर्वेक्षणासाठी सरकारची तयारी :

सोमवारपासून या भागातील जमिनीवर प्रकल्पासाठी ड्रिलिंग करुन माती सर्वेक्षण होणार आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध लक्षात घेता प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय या सगळ्या परिसरात कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. बारसू, सडा बारसू, पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या परिसरात 22 एप्रिल ते 31 मे या कालावधीपर्यंत हे मनाई आदेश लागू असणार आहेत. दरम्यान, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मात्र त्यांच्या संवादानंतरही ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर आणि आंदोलनावर ठाम आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT