सगळ्यात मोठी बातमी... भारताचा पाकिस्तानवर मध्यरात्री Air Strike, 9 दहशतवादी ठिकाणं केली बेचिराख!
Operation Sindoor:7 मे 2025 रोजी भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले केले.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करत आज (7 मे) मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. आज मध्यरात्री 1.30 वाजता भारताने हा हल्ला केला आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले केले. हे हल्ले पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले. भारतीय लष्कराने या कारवाईद्वारे दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला आहे की, भारताच्या संयमाचा अंत पाहू नये.
‘ऑपरेशन सिंदूर’ नेमकं केलं तरी कसं?
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 7 मे 2025 रोजी मध्यरात्री ही कारवाई सुरू केली. भारतीय हवाई दलाने बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या ठिकाणांवर हल्ले केले. विशेष म्हणजे, हे सर्व हल्ले भारताने आपल्या हवाई हद्दीतूनच केले. या कारवाईत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, परंतु कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना हात लावण्यात आला नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले. भारतीय लष्कराच्या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबत माहिती देताना “#PahalgamTerrorAttack Justice is Served. Jai Hind!” असा संदेश देण्यात आला.
पाकिस्तानची प्रतिक्रिया
या हल्ल्यांनंतर पाकिस्ताननेही आपली सर्व लढाऊ विमाने हवेत झेपावली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी या हल्ल्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत “योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी” प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. तसेच, पाकिस्तान लष्करानेही भारताने हवाई हल्ले केल्याची पुष्टी केली आहे. मात्र, भारताने या कारवाईद्वारे स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला आश्रय देणाऱ्या कोणत्याही देशाला सोडले जाणार नाही.
हे ही वाचा>> Ind vs Pak: पाकिस्तानी लष्कराचा ताफा भारताच्या दिशेने.. आता युद्ध होणार?
पाकिस्तानवर भारताची करडी नजर
या कारवाईनंतर भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले आहे. पाकिस्तान कोणत्या देशांकडून इंधन घेत आहे, कोणते देश त्याला मदत करत आहेत, आणि त्यांच्या नौदलाच्या हालचाली काय आहेत, यावर भारत बारकाईने नजर ठेवून आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या संरक्षण वेबसाइट्सवर सायबर हल्ला करून गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भारतीय लष्कराने केला आहे.