अजितदादांच्या धाकट्या मुलाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहितीए.. कोण आहेत जय पवार?
Who is Jay Pawar: अजित पवार यांचे धाकटे चिंरजीव जय पवार हे सध्या त्यांच्या एंगेजमेंटनंतर खूपच चर्चेत आहेत. जाणून घ्या त्यांच्याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे द्वितीय पुत्र जय पवार हे सध्या खूपच चर्चेत आहेत. नुकतंच साखरपुडा झालेल्या जय पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. पवार कुटुंबातील जय पवार यांनी गेल्या काही वर्षांत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव असलेले जय पवार यांनी आपल्या मृदू स्वभावाने आणि व्यवसायातील कौशल्याने लक्ष सर्वांचे वेधून घेतलं आहे. चला तर जय पवार यांच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
कौटुंबिक पार्श्वभूमी
जय पवार हे पवार कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे वडील अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. जय यांचे आजोबा शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि भारतीय राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व आहेत. जय यांचा मोठा भाऊ पार्थ पवार यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, तर जय यांनी राजकारणापासून सुरुवातीला अंतर राखले होते. त्यांची आई सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
हे ही वाचा>> अजितदादांच्या मुलाला क्लिन बोल्ड करणारी ऋतुजा पाटील आहे तरी कोण?, जय पवारांची कशी पडली विकेट?
शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द
जय पवार यांनी आपले शिक्षण परदेशात पूर्ण केले आहे. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये उच्च शिक्षण घेतले असून, पवार कुटुंबाच्या व्यवसायात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुरुवातीच्या काळात जय यांनी दुबईत कुटुंबाच्या व्यवसायाची धुरा सांभाळली होती. यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवस्थापनाचा अनुभव मिळाला. गेल्या काही वर्षांपासून ते बारामतीत स्थायिक झाले असून, स्थानिक पातळीवर विविध व्यावसायिक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांचा उद्योगाकडे असलेला ओढा आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांना तरुण उद्योजक म्हणून ओळख मिळाली आहे.
सामाजिक आणि राजकीय प्रवास
जय पवार यांनी सुरुवातीला राजकारणापासून अंतर राखले असले, तरी गेल्या काही वर्षांत त्यांनी बारामतीतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका निभावली. याशिवाय, त्यांनी बारामतीत स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवला आहे. गावपातळीवरील कुस्ती आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन, नोकरी मेळावे आणि तरुणांसाठी विविध उपक्रमांमुळे त्यांची तरुणांमधील लोकप्रियता वाढत आहे.










