नागपूर : '15 लाखांत पदे विकली जातात..' सीजेपीच्या आंदोलनात तरुण काय म्हणाले?
नागपूरमध्ये अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलन झाले. यासाठी नागपूरसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी युवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपूर : '15 लाखांत पदे विकली जातात..'
सीजेपीच्या आंदोलनात तरुण काय म्हणाले?
Nagpur CJP Protest : नागपुरातील ऐतिहासिक संविधान चौकात 'काँग्रेस जनता पार्टी' अर्थात 'कॉकरोच जनता पार्टी'चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनात नागपूरसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नुकत्याच झालेल्या नीट (NEET) परीक्षेतील घोटाळा आणि पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले असून, या बेजबाबदार कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी एकच मुख्य मागणी आंदोलकांनी यावेळी लावून धरली.
15 लाखांची मागणी
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गोंदियासारख्या दूरच्या जिल्ह्यातून पहाटेच निघालेल्या एका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने आपली व्यथा मांडली. 15 दिवसांवर परीक्षा आलेली असताना अभ्यास सोडून आंदोलनात यावे लागल्याचे सांगत त्याने शिक्षण व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला. केवळ 'नीट'च नव्हे, तर नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्येही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप या विद्यार्थ्याने केला. मैदानी चाचणी (ग्राउंड) क्लिअर केल्यानंतर 15-15 लाख रुपयांची मागणी करून पदे विकली जात असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्याने केला. या भ्रष्ट शिक्षण आणि भरती व्यवस्थेमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
हे ही वाचा : Operation Tiger Live Updates : 'जनता गप्प बसणार नाही, राडा होईल..' संजय राऊतांचा घणाघात
सिस्टिम बदलण्याची गरज
आंदोलनादरम्यान 'मिनी जरांगे पाटील' म्हणून ओळखले जाणारे कृष्णा यांच्यासह अनेक तरुण आणि पालकांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या अंधारात असून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि सरकारचा कारभार पूर्णपणे बोंगळ असल्याचा आरोप पालकांनी केला. टेलिग्रामसारखे ॲप्स बंद करून पेपरफुटी थांबणार नाही, तर सरकारने आपली संपूर्ण यंत्रणा आणि सिस्टीम बदलण्याची गरज आहे, असे मत संतप्त पालकांनी व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणारे 'सीजेपी'चे प्रमुख अभिजीत दीपके यांच्यावर नुकताच जयपूर येथे झालेला हल्ला हा अत्यंत निषेधार्ह असून, चांगल्या मार्गाने जाणाऱ्यांना दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा घणाघातही कार्यकर्त्यांनी केला.
हे ही वाचा : 'गदारीचा शिक्का लावून...', ओमराजे निंबाळकरांनी 'तो' व्हिडीओ शेअर करताच कमेंट्सचा पाऊस
...तोपर्यंत लढा थांबणार नाही
'सीजेपी' ही कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाशी संबंधित नसून ती केवळ न्यायासाठी लढणारी पार्टी असल्याचे आंदोलक युवकांनी स्पष्ट केले. सरकार जोपर्यंत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. नागपुरातील या आंदोलनानंतर आता आगामी २० जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे देशभरातील तरुणांचा एक भव्य 'आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. देशभरातून सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थी दिल्लीत एकत्र येऊन सरकारला नमवतील आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीत, असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.









