Rajya Sabha 2024 : मेधा कुलकर्णींना राज्यसभा! भाजपने एका दगडात मारले दोन पक्षी
Medha Kulkarni Pune BJP Politics : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेत पाठवलं आहे. पण, यामागील नेमकं राजकारण काय?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती

मेधा कुलकर्णींना राज्यसभेत पाठवण्याचे कारण काय?

राज्यसभा निवडणुकीतच भाजपचे लोकसभेचे गणित
Medha Kulkarni Rajya Sabha : भाजप राज्यसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी देणार या चर्चेवर अखेर पडदा पडला. कारण अनेक इच्छुक उमेदवारांची नावं समोर येत होती. भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात एक नाव आहे, पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांचं.
२०१४ ला निवडून येत कोथरुडमध्ये आपलं स्थान पक्क केलेल्या मेधा कुलकर्णी यांना २०१९ ला उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णी काहीशा नाराज झाल्या होत्या. सतत अन्याय झाल्याचा सूर लावणाऱ्या मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. पण, या निमित्ताने भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन भाजपने नेमकं काय साधलं?
कोथरूड विधानसभेतील राजकारण
२०१९ ची विधानसभेची निवडणूक. चंद्रकांत पाटील यांना विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला. यावेळी त्यांच्यासाठी भाजपने सर्वात सुरक्षित असलेल्या कोथरुड मतदारसंघाची निवड केली.
कोथरुड मतदारसंघात मेधा कुलकर्णी या आमदार होत्या. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असताना त्यांना पुण्यातून आणि त्यातूनही कोथरुडमधून उमेदवारी दिल्याने त्या नाराज झाल्या. पण, हे त्यांच्यापुरतं मर्यादित राहील नाही. मेधा कुलकर्णी यांना डावललं गेल्याने पुणे शहर भाजपमध्ये देखील दोन गट पडले. मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन कसं करणार, असा प्रश्न त्यावेळी भाजप समोर निर्माण झाला होता.