Nana Patole यांचा राजीनामा मंजूर, प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' नेत्याची काँग्रेसने केली निवड

मुंबई तक

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर या पदावर असलेल्या नाना पटोले यांचा राजीनामा देखील मंजूर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नवी दिल्ली: महाराष्ट्र काँग्रेसचे नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावर अखेर आज (13 फेब्रुवारी) शिक्कामोर्तब झालं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर पक्ष नेतृत्वाने नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ज्यानंतर आता ही जबाबदारी बुलढाण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतलेलं असलं तरी काँग्रेस नेतृत्वाने हे पद हर्षवर्धन सपकाळ यांच्या निमित्ताने विदर्भाकडे ठेवलं आहे. हर्षवर्धन हे पश्चिम विदर्भातील आहे. ते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. 

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द अगदी गावपातळीपासून सुरू झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे. 1999 ते 2002 पर्यंत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 2014 ते 2019 दरम्यान ते काँग्रेसचे आमदारही होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जात असल्याने, नवीन अध्यक्षांसमोर या निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

हे ही वाचा>> मूड ऑफ द नेशन: महाराष्ट्रात मविआचं काही खरं नाही, सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

हर्षवर्धन सपकाळ हे सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारित ग्राम स्वराज्याच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्र उभारणी युवा शिबिरे आयोजित करण्याचा, ग्राम स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा आणि आदर्श ग्राम चळवळीचा अनुभव आहे.

प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत विजय वडेट्टीवार यांचेही नाव होते, परंतु पक्षाच्या हायकमांडने राहुल गांधी यांच्या जवळचे असलेले हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाला मान्यता दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे सध्या 57 वर्षांचे आहेत. त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांनंतर मुंबईलाही नवीन अध्यक्ष मिळू शकतात, सध्या तिथली जबाबदारी वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे. मात्र, त्या आता खासदार झाल्या आहेत. अशावेळी आता त्यांची जबाबदारी इतर दुसऱ्या नेत्यावर सोपावली जाऊ शकते.

हे वाचलं का?