'मला तर अक्षरश:...', राज ठाकरे पहिल्यांदाच KDMC बाबत बोलले.. तेही उद्धव ठाकरेंच्या समोरच!
Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीमध्ये जे घडलं त्यामुळे व्यथित झालो. असं म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उद्धव ठाकरे हे देखील समोरच हजर होते.
ADVERTISEMENT

मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) मनसेने (MNS) अनपेक्षितपणे शिंदेंच्या शिवसेनेला (Shiv Sena Shinde) पाठिंबा देत सर्वांनाच बुचकाळ्यात टाकलं होतं. या निर्णयावर शिवसेना UBT ने सुरुवातीला टीकाही केली. पण या सगळ्या प्रकाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नेमकी भूमिका समोर आली नव्हती. मात्र, आज पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी KDMC मध्ये जे घडलं त्याबाबत भाष्य केलं आणि ते देखील शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) समोरच.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचा विशेष कार्यक्रम हा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे हे देखील हजर होते. यावेळी त्यांनी KDMC मध्ये मनसेने दिलेल्या पाठिंब्याबाबत काहीसा ओझरता उल्लेख केला.
हे ही वाचा>> ‘बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या…’, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
पाहा KDMC मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबाबत राज ठाकरे काय म्हणाले
आजची ही राजकारणाची परिस्थिती पाहिली.. मी त्या दिवशी माझ्या भाषणात म्हटलं बाळासाहेब आज असायला हवे होते. पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालीए, म्हणजे गुलामांचा बाजार.. महाराष्ट्रातील हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय की, बाळासाहेब नाहीएत ते बरंय.. तो माणूस किती व्यथित झाला असता.. त्या माणसाला काय त्रास झाला असता. हे सगळं चित्र महाराष्ट्रात उभं राहिलेलं दिसतंय.. जसे ते पूर्वी चावडीवर उभे राहायचे आणि माणसांचे लिलाव चालायचे. तसे आज महाराष्ट्रात लिलाव सुरू आहेत.
हे ही वाचा>> 'देशात हिंदू राजकीय शक्ती बनेल हे भाजपला माहिती नव्हतं', बाळासाहेबांमुळेच... राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा
आज अनेक ठिकाणी.. तुमच्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण-डोंबिवली असेल इतर ठिकाणी.. माझं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांशी बोलणं झालं. शिसारी आली शिसारी.. ज्याला व्यथित होणं म्हणतात ना.. काय चालूय आणि कुठे नेतोय आपण.. आज ही परिस्थिती पाहायला बाळासाहेब नाहीत यासारखी चांगली गोष्ट नाही.. की, तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीए.
ज्या गोष्टी शून्यातून उभ्या केल्या.. आज तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये बघा... अनेक लोकं तुम्हाला दिसतील की ती बाळासाहेबांनीच निर्माण केली होती. पण ज्या गोष्टी घडत गेल्या.. मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला 20 वर्षाचा काळ निघून गेला. अनेक गोष्टी मला उमजल्या, अनेक गोष्टी उद्धवलाही उमजल्या असतील.. द्या सोडून ते आता.. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.










