Sanjay Raut : सांगलीवर बोलत असाल तर आम्हीही कोल्हापूर, रामटेकचं... राऊतांचा थेट काँग्रेसला इशारा?
मविआत काही जागांवर एकमत झालं नसून, त्यामुळे जागा वाटप प्रलंबित असल्याचं राऊतांनी मान्य केलंय. तसंच त्यांनी कुणी सांगलीचा उल्लेख करत असेल तर आम्हीही कोल्हापूर, रामटेकचा उल्लेख करु शकतो असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला गर्भित इशारा दिला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून शिवसेना आणि काँग्रेसमधील अंतर वाढल्याचं चित्र दिसतंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जागावाटपावरुन मविआत तिढा कायम
काँग्रेस आणि शिवसेनेत एकमत होईना
मविआची यादी कधी जाहीर होणार
Sanjay Raut on MVA Seat Sharing मुंबई : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या युती आणि आघाडीचा जागावाटपासाठी बैठकांचा सपाटा सुरू आहे. एकीकडे काल भाजपने आपली 99 जणांची यादी जाहीर करून दंड थोपटले आहेत. तर एकनाथ शिंदे यांची यादीही तयार असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातंय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही जागांवरुन तिढा कायम असल्याचं दिसतंय. नुकत्याच झालेल्या मविआच्या बैठकांनंतर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन जागा वाटपावरून शिवसेना आणि काँग्रेसमधील अंतर वाढल्याचं चित्र दिसतंय. काही जागांवर अजूनही एकमत झालं नसून, त्यामुळे जागा वाटप प्रलंबित असल्याचं राऊतांनी मान्य केलंय. यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसला गर्भित इशारा दिला आहे. तसंच आघाडीत अशा गोष्टी होत असतात, त्यामुले याकडे दुर्लक्ष करा, आमची यादी आज संध्याकाळीही येऊ शकते असं राऊत म्हणाले. (Sanjay raut reaction on congress amid assembly elections 2024 seat sharing formula)
हे ही वाचा >>नाराजांना कसं समजावणार? तिकीट मिळताच दादांचा गेम प्लॅन
"...तर कोल्हापूर, रामटेकचा उल्लेख झाल्यास वाईट वाटायला नको"
भाजपने दुपारी भाजपने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे आठ दिवस बाकी आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही जागांवरुन एकमत होत नाहीये असं दिसतंय. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातला विसंवाद तर भर पत्रकार परिषदेतही दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपल्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं दाखवलं, मात्र अजूनही महाविकास आघाडीची यादीचं काम अंतिम टप्प्यात आली नसल्याचं दिसून येतंय. यावेळी संजय राऊत म्हणाले की, "मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, मात्र कुणी सांगलीचं नाव सांगत असतील तर आम्हीही कोल्हापूर, रामटेकसारख्या प्रेमाने काही जागा सोडल्या तर त्याच प्रेमाने आम्हाला काही जागा मिळाव्या असं म्हटलं तर कुणाला वाईट वाटू नये" असं म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला.
विदर्भातील काही जागांवर मविआमध्ये अजूनही एकमत होत नसल्याचं चित्र आहे. तसंच काही ठराविक जागा शिवसेनेला सोडायच्याच नाही असा सूर राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील हायकमांडकडे लावल्याचं म्हटलं जातंय. त्यावर राऊत म्हणाले की, 'असे सूर लागत नाही, त्यामुळे सगळ्यांचे सूर बिघडतात'असा गर्भित इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. तसंच एकत्र निवडणुका लढत असताना प्रत्येकाला एक पाऊल मागे-पुढे घ्यावं लागतं असं राऊत म्हणाले.
भाजपने यादी जाहीर करुन तीर नाही मारला : राऊत
भाजपने काल 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपने जवळपास सगळ्या विद्यमान आमदारांनाच तिकीट दिलं, त्यात काही तीर मारला नाही असं संजय राऊत म्हणाले.










