Sharad Pawar : महाराष्ट्रात झाला, आता दुसरा राजकीय भूकंप कोणता?
सुप्रिया सुळे यांनी पुढील 15 दिवसांत दोन राजकीय भूकंपाचे धक्के बसणार असून, एक दिल्लीत तर दुसरा महाराष्ट्रात असेल असं विधान केलं होतं. राजकीय भूकंपाचा पहिला धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयाने महाराष्ट्रात आणि देशातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या निर्णयाचं वेगवेगळ्या बाजूने विश्लेषण केलं जात असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एप्रिल महिन्यात केलेल्या विधानाची आता जोरदार चर्चा होत आहे. सुप्रिया सुळे यांनी पुढील 15 दिवसांत दोन राजकीय भूकंपाचे धक्के बसणार असून, एक दिल्लीत तर दुसरा महाराष्ट्रात असेल असं विधान केलं होतं. राजकीय भूकंपाचा पहिला धक्का बसला आहे. आता दुसरा धक्का कोणता असणार, याबद्दल तर्कविर्तक लावण्यास सुरवात झाली आहे.
ADVERTISEMENT
दिवस होता 19 एप्रिल 2023. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं. “पुढील 15 दिवसांत दोन राजकीय भूकंप होणार आहे. एक नवी दिल्लीत तर दुसरा महाराष्ट्रात होईल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ शोधण्याचा आणि लावण्याचा प्रयत्न झाला, पण शरद पवार राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार, याची कुणालाही कल्पना त्यातून आली नाही.
हेही वाचा >> “राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार”, शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी केलं आवाहन
शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा केल्यानंतर सुप्रिया सुळेंच्या विधानाचा अर्थ लक्षात आला. सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर 13 दिवसांनी शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला. सुप्रिया सुळे व्यक्त केलेल्या भाकितानुसार पहिला राजकीय भूकंप तर झाला आहे, पण दुसरा भूकंप कोणता, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हे वाचलं का?
अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा…
सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं, तेव्हा अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या. भाजपसोबत जाण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेला पक्षातील 30 ते 34 आमदारांचा पाठिंबा असल्याचं वृत्तही समोर आलं होतं.
हेही वाचा >> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होणार का? अजित पवारांनी मांडली भूमिका
महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये याबद्दल लिहिलं. त्यानंतर खळबळ उडाली होती. या राजकीय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंच्या विधानाचे वेगळे अर्थ लावले गेले.
ADVERTISEMENT
भाकरी फिरवण्याची वेळ… पवारांचं विधान
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं विधान केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबद्दल होतील, याचे संकेत पवारांनी दिल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, शरद पवारांनी स्वतःच पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याची निर्णय जाहीर केल्यानं धक्का बसला.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र झाला दिल्लीत काय?
सुप्रिया सुळेंनी 19 एप्रिल रोजी विधान केलं. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 18 एप्रिल रोजी सुत्रांनी इंडिया टुडेला माहिती दिली होती की, पक्षातील आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. केंद्रीय यंत्रणांच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी भाजपसोबत जायला हवं, अशी भूमिका या आमदारांची असल्याचं सुत्रांनी सांगितलं. मात्र, अजित पवारांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आणि मरेपर्यंत राष्ट्रवादीत काम करेन असं स्पष्ट केलं. असं असलं तरी शरद पवारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता दिल्लीत काय घडणार या चर्चेनं मात्र डोकं वर काढलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT