Uddhav Thackeray : “त्यासाठी सावरकर व्हा”, राहुल गांधींवर घणाघाती टीका
Shiv Sena UBT Attacks On Rahul Gandhi after criticizes savarkar : “महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
rahul gandhi statement on savarkar, Shiv Sena UBT slams congress : ‘माफी मागायला मी सावरकर नाहीये, तर गांधी आहे आणि गांधी कधी माफी मागत नाही,’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर केलं. त्यांच्या याच विधानावरून शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोंडी झालीये. राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून भाजप आणि शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरलं. त्यानंतर सामनात “त्यासाठी सावरकर व्हा” असा अग्रलेख लिहून राहुल गांधींवर घणाघाती टीका करण्यात आलीये. “राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल”, असा इशारा सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावर भाष्य करताना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखात म्हटले आहे की, “राहुल गांधी वारंवार बोलत आहेत की, मी घाबरत नाही. मला तुरुंगात डांबले तरी प्रश्न विचारत राहीन. राहुल गांधी हे घाबरत नाहीत व अदानी-मोदी संबंधांवर वारंवार प्रश्न विचारीत आहेत हे खरेच, पण राहुल गांधी यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या संपूर्ण पक्षाला व देशालाही निर्भय बनविण्याची गरज आहे.”
वाचा – Uddhav Thackeray : “भाजप मिंधेंच्या नेतृत्वात लढणार का? हिंमत असेल तर…” ठाकरेंनी दिलं आव्हान!
“माझे आडनाव सावरकर नाही, अशी विधाने वारंवार करून ही निर्भयता निर्माण होणार नाही व वीर सावरकर यांच्या बाबतीत जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेलाही तडा जाणार नाही. वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत. सावरकरांना अकारण ‘माफीवीर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही. ‘वीर सावरकर’ या नावात तेज आहे. अन्याय व गुलामीविरुद्ध लढण्याचे बळ आहे. वीर सावरकरांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंग्लंड व आपल्या देशातही योद्धे निर्माण केले, त्या योद्ध्यांनी जुलमी राज्यकर्त्यांवर ‘धाडधाड’ गोळ्या चालवल्या व त्या कृत्याबद्दल सावरकरांनी कधीच खेद व्यक्त केला नाही. सावरकरांनी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील.”
हे वाचलं का?
“सावरकर कुटुंबाच्या त्यागाची अवहेलना कुणालाच करता येणार नाही”
“मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली हा अन्याय आहे, पण वीर सावरकरांची मानहानी करून ते ज्या सत्यासाठी लढू पाहत आहेत, त्या सत्याचा विजय होणार नाही. राहुल गांधी हे शहीदांच्याच कुटुंबात जन्मास आले व ते खरेच आहे. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढ्यात वडिलोपार्जित सर्वस्व पणास लावले. त्यांनी त्यांचा काळा पैसा एखाद्या अदानीत गुंतवून व्यापार केला नाही. त्यांचे जीवन देशासाठीच होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही देशासाठी सर्वोच्च बलिदान केले व त्या बलिदानाची जाणीव देशाला सदैव राहील, पण वीर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने राष्ट्रासाठी तितकाच महान त्याग केला. त्या महान त्यागाची अवहेलना कुणालाच करता येणार नाही”, असं शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटले आहे.
वाचा – उद्धव ठाकरेंनी नाशिक सोडून मालेगावच का निवडलं? काय आहे राजकीय रणनीती?
“राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतली, पण सावरकरांची ‘बॅरिस्टर’ ही पदवीच इंग्रजांनी काढून घेतली. त्यांचे सर्व साहित्य जप्त केले. वीर सावरकरांचे जीवन प्रेरणादायी होते व राहील. सावरकर इंग्रजांना कधीच घाबरले नाहीत. पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावल्यावरही ते हसत हसत म्हणाले, ‘पण इंग्रजांचे राज्य माझ्या देशावर पन्नास वर्षे राहील काय? त्याआधीच ते उलथवून टाकू.’ वीर सावरकर समजून घेण्यासाठी मोठे मन व वाघाचे काळीज पाहिजे. सावरकरांचा अवमान वा त्यांच्यावर चिखलफेक करण्यापूर्वी सावरकरांचे मोठेपण समजून घेतले तर स्वातंत्र्यवीरांची बेअदबी अथवा हेटाळणी करण्यास कोणीही धजावणार नाही”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल गांधींवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र काँग्रेसची अडचण होईल, सामना अग्रलेखातून इशारा
“वीर सावरकरांची थोरवी सांगायची तरी किती? पण विद्यमान राजकारणात सावरकरांचे नाव ओढून त्यांना खुजे ठरवण्याचा प्रयत्न क्लेशदायक आहे. राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या गावागावांत वीर सावरकर अनेक स्वरूपात उभे आहेत व ते ताठ कण्याने उभे आहेत”, असा इशारा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल गांधी आणि काँग्रेसला दिला.
ADVERTISEMENT
सावरकरांप्रमाणे राहुल गांधींनी शपथ घ्यावी, शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काय म्हटलं आहे?
“राहुल गांधींवर शंभर टक्के चुकीची कारवाई झाली आहे व इतके सर्व होऊनही राहुल गांधी डगमगले नाहीत, पण इंदिरा गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले तेव्हा देशात एक जबरदस्त चीड निर्माण झाली. तेव्हा आजच्याप्रमाणे वृत्तवाहिन्या, सोशल मीडियाचा वापर नव्हता. तरीही लोकांची मने इंदिरा गांधींच्या अन्यायाविरुद्ध धडकत होती व त्याच वातावरणाचा फायदा घेऊन इंदिरा गांधी पुन्हा वाजत गाजत सत्तेवर विराजमान झाल्या. राहुल गांधी हे सर्व नाट्य कसे घडवणार? पंतप्रधान मोदी हे पत्रकार परिषदा घेत नाहीत. प्रश्नोत्तरांना ते घाबरतात. राहुल गांधी जाहीर पत्रकार परिषदा घेतात. राहुल गांधी यांचे म्हणणे असे की, मोदी यांच्या डोळ्यात मला भीती दिसते. म्हणून त्यांनी मला लोकसभेतून अपात्र ठरवले. हुकूमशहा हा सदैव डरपोकच असतो. हुकूमशहा आधी न्यायव्यवस्था ताब्यात घेतो, संसदेवर ताबा मिळवतो व विरोधकांना नष्ट करतो. यालाच गुलामी म्हणतात. याच गुलामीविरुद्ध लढण्यासाठी वीर सावरकरांनी वयाच्या बाराव्या वर्षी घरातील अष्टभुजा देवीसमोर क्रांतिकारक शपथ घेतली, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन!’ राहुल गांधी यांनी अशीच शपथ घेऊन सध्याच्या गुलामीविरुद्ध लढा उभारायला हवा”, असा राजकीय सल्ला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल गांधींना दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT