M. K. Stalin यांचा पराभव करणारे 'जायंट किलर', V. S. Babu कोण आहेत? थलपती यांनी कसं हेरलं?

मुंबई तक

tamil nadu assembly election results 2026 : तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये मोठा उलटफेर झाला असून, एम.के. स्टालिन यांना कोलाथूर या त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टीव्हीकेच्या व्ही.एस. बाबू यांनी त्यांचा पराभव केला आहे.

ADVERTISEMENT

tamil nadu assembly election results 2026
tamil nadu assembly election results 2026
google news

बातम्या हायलाइट

point

M. K. Stalin यांचा पराभव करणारे 'जायंट किलर'

point

V. S. Babu कोण आहेत? थलपती यांनी कसं हेरलं?

tamil nadu assembly election results 2026 : तामिळनाडू विधानसभा निकालांनी दिग्गजांना धक्का दिलाय. राज्यात सत्ता परिवर्तन तर झालेच, शिवाय द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टालिन यांना त्यांच्या हक्काच्या कोलाथूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मतमोजणीच्या 22 व्या फेरीनंतर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, अभिनेता विजय थलपती यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे उमेदवार व्ही.एस. बाबू यांनी स्टालिन यांचा 8,795 मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत व्ही.एस. बाबू यांना 82,997 मते मिळाली, तर स्टालिन यांच्या पारड्यात 74,202 मते पडली. कोलाथूर हा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आल्यापासून स्टालिन यांचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होते, मात्र पहिल्यांदाच त्यांना येथे पराभूत व्हावे लागले असून यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात टीव्हीके हा एक नवीन आणि शक्तिशाली पक्ष म्हणून उदयास आल्याचे दिसत आहे.

 कोण आहेत व्ही.एस. बाबू? सामान्य कार्यकर्ता ते 'जायंट किलर' पर्यंतचा प्रवास

मुख्यमंत्र्यांना पराभवाची धूळ चारणारे व्ही.एस. बाबू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मुळात द्रमुक (DMK) पक्षातूनच केली होती. त्यांनी तळागाळातील संघटक म्हणून काम करत उत्तर चेन्नई जिल्हा सचिव पदापर्यंत मजल मारली होती आणि चेन्नईच्या शहरी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. 2006 मध्ये त्यांनी पुरासावल्कम मतदारसंघातून विजय मिळवून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली, परंतु द्रमुक पक्षांतर्गत बदललेल्या समीकरणामुळे आणि पी.के. शेखरबाबूंसारख्या नेत्यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांचे पक्षातील स्थान कमी होत गेले. कालांतराने त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आले, परिणामी त्यांनी द्रमुक सोडून काही काळ अण्णा द्रमुकमध्ये (AIADMK) प्रवेश केला आणि अखेर 2026 च्या निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश केला.

कोलाथूरमध्ये स्टालिन यांच्या वर्चस्वाला खिंडार; टीव्हीके पक्षाची धमाकेदार एन्ट्री

कोलाथूर हा मतदारसंघ मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता, कारण 2008 पासून ते सातत्याने या जागेचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, व्ही.एस. बाबू यांनी या मतदारसंघात स्टालिन यांच्या विरोधात आक्रमक प्रचार करत हा गड सर केला आणि स्टालिन यांची अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बाबू यांनी मिळवलेला 8,795 मतांचा विजय हा 2026 च्या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा निकाल मानला जात आहे. या विजयामुळे केवळ स्टालिन यांना वैयक्तिक धक्का बसला नाही, तर राज्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे चालत आलेल्या द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या द्विपक्षीय वर्चस्वाला टीव्हीकेच्या रूपाने एक सक्षम पर्याय मिळाल्याचे संकेत मिळाले आहेत. टीव्हीके पक्षाची ही पहिलीच निवडणूक असून पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्र्यांसारख्या दिग्गज नेत्याला पराभूत केल्याने राजकीय विश्लेषकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

हे वाचलं का?