Uddhav Thackeray: ‘मुंबईत जन्म घेतल्याचे असे पांग फेडताहेत का?’, ठाकरे अमित शाहांवर का भडकले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी कौतुक केले. त्यांच्या या कौतुकानंतर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून अमित शाहांवर खोचक टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray-Amit Shah News : अमित शाह पुण्यात येऊन गेले. यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. शाहांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की, त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो. शिंदे, पवार आणि फडणवीसांनी उधळलेल्या स्तुतीसुमनांवरून आता उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून अमित शाहांवर हल्ला चढवलाय.
‘अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे नक्की काय?’, या मथळ्याखाली सामनात अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात सुरुवातीलाच ‘पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शाह यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. फडणवीस यांनी इतके केले. मग मुख्यमंत्री मिंधे आणि अजित पवार तरी कसे मागे राहतील? त्यांचीही गाडी सुसाट सुटली’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे आणि पवार-फडणवीसांना लक्ष्य करण्यात आलंय.
ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलं आहे की, “शाह यांचा जन्म मुंबईतला, शाह यांनी मुंबईत व्यापार केला आहे. कारखाना चालवला आहे. त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो, असे प्रशस्तीपत्र फडणवीसांनी द्यावे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. जे व्यापारी डोक्याचे आहेत त्यांना मुंबईचे महत्त्व माहीत असायलाच हवे. पोर्तुगीजांनी मुंबईत व्यापार केला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईस व्यापारी केंद्र बनवले. आता हे नवे शेठ मंडळ आले.”
शेठ मंडळ… मोदी शाहांवर हल्ला
“मुंबईचे महत्त्व कमी व्हावे. मुंबई कमजोर पडावी यासाठी हे ‘शेठ मंडळ’ नेहमीच पडद्यामागून कारस्थाने करीत आले. गेल्या आठ-नऊ वर्षांत या कारस्थानांना जास्तच विष चढले आहे. कारण देशाची सूत्रे गुजरातच्या ताब्यात असून मुंबई-महाराष्ट्र कमजोर करण्याच्या डावपेचांना निरंकुश सत्तेमुळे बहार आली आहे. महाराष्ट्रातले सध्याचे सरकार त्याच हेतूने बसवले गेले आहे व महाराष्ट्राची लूट मिंधे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे”, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.