पुण्याच्या 7 वर्षाच्या देशनाची अभिमानास्पद कामगिरी! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव

तिने चीनच्या 14 वर्षीय किशोरीचा रेकॉर्ड मोडत विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
Deshna nahar 7 years world record holder in limbo sketing
Deshna nahar 7 years world record holder in limbo sketing

पुण्यातील 7 वर्षीय देशना नहारने लिंबो स्केटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. तिने चीनच्या 14 वर्षीय किशोरीचा रेकॉर्ड मोडत विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. अवघ्या 13.74 सेकंदात तिने 20 मोटार कारच्या खालून जात हा रेकॉर्ड बनवला आहे. हाच रेकॉर्ड 2015 साली चीनच्या 14 वर्षीय किशोरीने 14.15 सेकंदात पूर्ण केला होता. त्या रेकॉर्डच्या 7 वर्षानंतर आता किशोरीपेक्षा वयाने 7 वर्षाने लहान असलेल्या देशनाने तिचा रेकॉर्ड मोडत विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

पुण्यातल्या देशना नहारचा लिंबो स्केटिंगमध्ये रेकॉर्ड गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

देशना आदित्य नहार असं या 7 वर्षीय वर्ल्डरेकॉर्ड होल्डरचं नाव आहे. अवघ्या सातव्या वर्षी तिने हा पराक्रम केल्याने सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड समितीने प्रमाणपत्र देऊन तिचं गौरव केलं. तिसरीच्या वर्गात शिकणारी देशना वयाच्या 5 व्या वर्षांपासून लिंबो स्केटिंगचा सराव करते. दोन वर्ष तिने घेतलेल्या मेहनतीचा हा फळ आहे, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. विजय मालजी असं तिच्या प्रशिक्षकांचं नाव आहे. त्यांनी तिला लिंबो स्केटिंगचे प्रशिक्षण दिले आहे. देशनाच्या आजीने देखील तिला या खेळ प्रकारासाठी प्रोत्साहित केलं असल्याचं ती सांगते.

जेंव्हा तिच्या कोचने इतक्या कमी सेकंदात हा रेकॉर्ड करायचे आहे असं सांगितल्यास, मला ते अशक्य वाटत होतं. मात्र, मी तिची स्केटिंग पाहिल्यास मला देखील विश्वास बसला की देशना हे करू शकते, असं तिचे वडील म्हणाले. सुरवातीच्या काळात देशना कारच्या खालून जाताना घाबरत होती. मात्र, कोचच्या प्रशिक्षणाने आणि तिच्या मेहनतीने हे साध्य झालं, असं तिचे वडील सांगतात. तर देशना कशापद्धतीने आपला अभ्यास, डायट आणि दिवसभरातील रुटीन सांभाळून सराव करायची, हे कौतुकाने तिची आई सांगत होती.

आतापर्यंत देशभरातील अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला आहे. स्केटिंगमधील विविध स्पर्धांमध्ये तिला सुमारे 16 प्रमाणपत्रे आणि 40 पदके मिळाली आहेत. यापुढचा तिचा 100 कारच्या खाली स्केटिंग करण्याचा ध्येय असल्याचं तिने बोलून दाखवलं. वयाच्या सातव्या वर्षी अशक्य असणारी गोष्ट साध्य करून पुण्याच्या देशनाने देशाचे नाव उंचावले आहे. त्यासाठी तिने घेतलेली मेहनत आणि उराशी बाळगलेली जिद्द ही महत्वाची होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in