मुंबई : उंच इमारतीवरुन वीट कोसळली अन् कामावर निघालेल्या तरुणीच्या डोक्यावर पडली, रुग्णालयता नेताच...
Mumbai Accident News : मुंबईतील उंच इमारतीवरुन वीट कोसळली अन् कामावर निघालेल्या तरुणीच्या डोक्यावर पडली, रुग्णालयता नेताच...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उंच इमारतीवरुन वीट कोसळली अन् तरुणीच्या डोक्यावर पडली
रुग्णालयात नेण्यापूर्वीच तरुणीने प्राण सोडले
मुंबई : उंच इमारतीतून वीट कोसळली आणि थेट बँकेतील नोकरीसाठी निघालेल्या तरुणीच्या डोक्यात पडली. यामध्ये त्या तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जोगेश्वरीतील मजासवाडी परिसरात घडली. संस्कृती अमीन असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. ती नुकतीच एका खासगी बँकेत नोकरीस लागली होती. तिच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिमेंटची वीट डोक्यावर कोसळली अन् तरुणीचा जागेवर मृत्यू
अधिकची माहिती अशी की,संस्कृती अमीन ही जोगेश्वरी (पूर्व) येथील मजासवाडी भागात आपल्या आई-वडिलांसोबत राहात होती. तिने नुकताच हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि काही आठवड्यांपूर्वीच बँकेत रुजू झाली होती. नेहमीप्रमाणे ती बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान, धोबीघाट परिसरातील एका इमारतीच्या बांधकामाजवळून जात असताना अचानक वरून सिमेंटची वीट तिच्या डोक्यावर कोसळली. वीट थेट डोक्यावर आदळल्याने संस्कृती जागीच बेशुद्ध पडली. तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. गंभीर जखम आणि अतोनात रक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : सचिन घायवळ शस्त्रपरवाना प्रकरण तापलं, मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी; सुषमा अंधारे आक्रमक
बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मेघवाडी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून, बांधकाम सुरू असताना निष्काळजीपणा झाल्याचा तपास सुरू आहे. संबंधित ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.










