Monsoon Update: Red अलर्ट, पुढचे 3 दिवस कोणत्या जिल्ह्यांना धोका?
Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून कोकण, मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

Mumbai Rain Alert: मुंबई: मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता हा पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत ज्या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, त्या भागांमध्ये आणखी पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत आहेत.
अरबी समुद्रातील हवामान प्रणालीमुळे पावसाला पोषक वातावरण
सध्याच्या उपग्रह चित्रांनुसार अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती झाली असून ते महाराष्ट्राच्या दिशेने सक्रिय आहेत. याशिवाय अरबी समुद्रात चक्रीय अभिसरण (Cyclonic Circulation) तयार झाले आहे. यामुळे कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा>> ‘असावा एखादा छंद...’ ट्रेंडचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पण नेमकं आहे तरी काय?
दुसरीकडे, मध्य प्रदेशापासून तेलंगणापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणालीचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यावर होत असून त्या भागातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कोकणात पावसाचा जोर राहणार कायम
उपग्रह चित्रांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण परिसरावर दाट ढगांचे आच्छादन स्पष्ट दिसत आहे. या ढगांची तीव्रता अधिक असल्याने पुढील दोन ते तीन दिवस मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.









