अहिल्यानगर : बायकोचे गावातल्या परपुरुषाशी अनैतिक संबंध, नवऱ्याचं भयंकर पाऊल

Ahilyanagar Crime News : 35 वर्षीय तरुणाने पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे आणि मानसिक-शारीरिक छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार आहेत.

ADVERTISEMENT

Ahilyanagar Crime News
Ahilyanagar Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अहिल्यानगर : बायकोचे गावातल्या परपुरुषाशी अनैतिक संबंध

point

नवऱ्याचं भयंकर पाऊल

Ahilyanagar Crime News : पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे तसेच मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून 35 वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढोकी गावात ही घटना घडली. संतोष विठ्ठल न-हे (वय 35, रा. ढोकी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात मृताच्या आई पारूबाई विठ्ठल न-हे (वय 52) यांनी घटनेनंतर सहा दिवसांनी, 25 जून रोजी रात्री पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी संतोष यांची पत्नी आशाबाई संतोष न-हे आणि तिचा कथित प्रियकर सुरेश आप्पा न-हे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : उल्हासनगर : एकाच दिवसात 8 जणांना सर्पदंश! पुढे काय घडलं?

"तू मरून जा, मग आम्हाला लग्न करता येईल"

फिर्यादीनुसार, आशाबाई न-हे आणि सुरेश आप्पा न-हे यांच्यात कथित प्रेमसंबंध होते. या संबंधांमुळे संतोष न-हे यांना सातत्याने मानसिक त्रास सहन करावा लागत होता. फिर्यादीत असा आरोप करण्यात आला आहे की, दोघेही संतोष यांच्याशी वारंवार वाद घालत, त्यांचा अपमान करत तसेच त्यांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचा आणि शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादीनुसार, "तू मरून जा, मग आम्हाला लग्न करता येईल. तुझी जमीन आमच्या नावावर करता येईल. आम्हाला सोडचिठ्ठी दे," अशा शब्दांत संतोष यांना वारंवार धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या कथित छळामुळे ते गंभीर मानसिक तणावाखाली गेले होते.

हेही वाचा : नागेश आष्टीकरांना मतं दिली, आता शेतकऱ्यांना खासदारांचं बंड पटलं का?

कथित छळाबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण

या मानसिक तणावातूनच संतोष न-हे यांनी २० जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात आणि पुढील दिवशी, २१ जून रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पतीच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर पत्नी आशाबाई न-हे हिने रुग्णालयातून पलायन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सुरुवातीला ही घटना आत्महत्येची असल्याचे समोर आले होते, मात्र मृताच्या कुटुंबीयांनी सातत्याने होत असलेल्या कथित छळाबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले.

या प्रकरणी पारनेर पोलिसांनी पत्नी आशाबाई संतोष न-हे आणि कथित प्रियकर सुरेश आप्पा न-हे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे करत आहेत. या घटनेमुळे ढोकी गावासह संपूर्ण पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.