नागेश आष्टीकरांना मतं दिली, आता शेतकऱ्यांना खासदारांचं बंड पटलं का?

Hingoli Politics : उद्धव ठाकरे यांच्या हिंगोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 'मुंबई Tak'ने शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

Hingoli Politics
Hingoli Politics
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नागेश आष्टीकरांना मतं दिली,

point

आता शेतकऱ्यांना खासदारांचं बंड पटलं का?

Hingoli Politics : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली दौरा केला. त्यावेळी 'मुंबई Tak'ने परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि खासदारांच्या पक्षांतराबाबत मत जाणून घेतले. शेतकऱ्यांनी यावेळी पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटासह पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीतील नुकसान आणि लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. अनेकांनी सांगितले की, निवडणुकीनंतर आमदार आणि खासदार गावात फारसे फिरकत नाहीत. शेतीची कामे सुरू असली तरी पुरेसा पाऊस नसल्याने पेरणी लांबली असून त्याचा मोठा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह 'या' जिल्ह्यांत पाऊस धुमाकूळ घालणार तर..

"आम्ही आष्टीकरांना नाही, ठाकरेंच्या उमेदवाराला मत दिलं"

संवादादरम्यान नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतराबाबत विचारले असता अनेक शेतकऱ्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. "आम्ही आष्टीकरांना नाही, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला मत दिलं होतं. ते आता दुसऱ्या गटात गेले, हे आम्हाला मान्य नाही," अशी भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास का ठेवला, असे विचारले असता "ते इमानदार आहेत" असे उत्तरही काही शेतकऱ्यांनी दिले. काही महिलांनी राजकीय मत व्यक्त करण्यास भीती वाटत असल्याचे सांगत, काही लोकांकडून धाक दाखवला जात असल्याचाही दावा केला.

हेही वाचा : शिंदेंच्या आमदाराचा 'टक्केवारीचा' कथित Video प्रचंड व्हायरल, शिवसेना करणार कारवाई?

"सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही"

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या दैनंदिन अडचणीही मांडल्या. पावसाअभावी पेरणी उशिरा झाली असून शेतीचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई असल्याने पाणी दूरवरून आणावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. काहींनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असले तरी हप्ते वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केली. काही लाभार्थ्यांची नावे वगळल्याचाही उल्लेख करण्यात आला. शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा व्यक्त केली असून, शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा बोजा असल्याचे सांगितले. सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेती परवडत नसल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली.

शेतकऱ्यांनी आपल्या भागात लोकप्रतिनिधी आणि कृषीमंत्री फारसे फिरकत नसल्याची तक्रार केली. दोन वर्षांपासून खासदार गावात आले नसल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला. शेती, पाणी, रोजगार आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काही महिलांनी आपल्या मुलांनी भविष्यात शेतीपेक्षा शिक्षण घेऊन इतर क्षेत्रात जावे, अशी इच्छा व्यक्त केली. राजकारण सुरूच राहील, पक्षांतरही होतील, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष गावात येऊन समस्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा संवादादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.