‘शरद पवार हे सैतान, ते पुन्हा येता कामा नये’, सदाभाऊ खोतांचा सुटला तोल
शरद पवार हे सैतान आहेत. पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक शरद पवार देत आहेत. जे घडत आहे, तो नियतीने उगवलेला सूड आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली.
ADVERTISEMENT

Sadabhau Khot vs sharad pawar : शरद पवार यांचे राजकीय विरोधक असलेल्या माजी मंत्री व रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत यांचा टीका करताना तोल सुटला. “शरद पवार हे सैतान आहेत. ते गावगाड्याकडे पुन्हा येता कामा नये, ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक शरद पवार देत आहेत. जे घडत आहे, तो नियतीने उगवलेला सूड आहे”, असं म्हणत सदाभाऊ खोतांनी पवारांना लक्ष्य केलं.
सदाभाऊ खोत हे सांगली जिल्ह्यातील कुरळूप या गावी कार्यकर्त्याच्या घरी भेटीसाठी आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडावर बोलताना सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर टीका केली.
शरद पवारांबद्दल सदाभाऊ खोत काय म्हणाले?
“शरद पवार यांचा जेव्हापासून राजकीय उदय झाला, तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली”, असा दावा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. वाडे विरुद्ध गावगाडे व प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष पवार यांच्या कारकिर्दीत सुरु झाला”, असा आरोप खोतांनी केला.
वाचा >> Chhagan Bhujbal : “सुप्रियांचं नाव येताच प्रफुल पटेल म्हणाले मी राजीनामा देतो”
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, “शरद पवार यांनी सोबत ठेवलेल्या सरदारांनी गोरगरीब शेतकऱ्यांची खळी लुटली. गावगाडा उद्ध्वस्त केला, तेच सरदार सध्या सैरभैर पळत आहेत. सध्या शरद पवार याच्यावर नियतीने सूड उगवला आहे. त्यामुळे शरद पवार साहेब गावगाड्याकडे धाव घेत ‘मला वाचवा’चा नारा देत आहेत”, असं खोत यांनी म्हटलं आहे.