Maratha Reservation : संभाजी भिडे धावले शिंदे सरकारच्या मदतीला, जरांगेंना काय दिला मेसेज?
मराठा आरक्षण : संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
ADVERTISEMENT
Sambhaji bhide Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करताहेत. सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, पण अद्याप यश आलेलं नाही. अशातच शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण थांबवण्याचे विनंती केली. या भेटीकडे संभाजी भिडे शिंदे सरकारच्या मदतीला धावल्याचे म्हणून बघितले जात आहे. तशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये. (Sambhaji Bhide meets Manoj Jarange)
आंतरवली सराटी येथे जाऊन संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना त्यांनी उपोषण थांबवण्याची मागणी केली. यावेळी भिडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
मनोज जरांगेंना संभाजी भिडेंनी काय सांगितलं?
संभाजी भिडे मनोज जरांगेंना म्हणाले की, “ज्ञानोबा-तुकोबा, एकनाथ-नामदेव, सावता माळी-गोरा कुंभार, विठ्ठल रुखमाईचा निरोप घेऊन आलोय. मी राजकारणी नाही. ज्याला काही मिळत नाही, त्या मुर्ख माणसाला जी काही उपमा असेल, ते नाव मी. आम्ही देश, देव, धर्मासाठी काम करणारे आम्ही तुमच्यासोबत आहोत. तेही ही समस्या संपेपर्यंत. आम्ही केवळ देखाव्यासाठी आलेलो नाही”, असे संभाजी भिडे हे मनोज जरांगे यांना म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Maratha Reservation : असा आहे मराठा आरक्षणाचा इतिहास?
“मराठा समाजाला पाहिजे तसं आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. या निश्चयाने आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत. तुम्ही जे करताय ते 101 टक्के योग्य करता आहात. हा प्रश्न आता राजकारण्यांच्या हातात आहे आणि जोपर्यंत त्यांच्या हातात हा प्रश्न आहे, तोपर्यंत शेवाळावरून चालण्यासारखं आहे”, संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना सांगितलं.
शिंदे-फडणवीस-पवारांबद्दल संभाजी भिडे काय बोलले?
“एक चांगली गोष्ट आहे की, आता जे राजकारणी सत्तेवर बसले आहेत. एकनाथराव शिंदे अजिबात लबाड नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार ते जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, तरी काळजी असलेला माणूस आहे”, अशा शब्दात संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 59 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात 50 टक्के मर्यादा का?
“माझं असं म्हणणं आहे की, हे आंदोलन तुम्ही जिवाच्या आकांताने चालवलं. कौतुक वाटावं असं चालवलं आहे, यात दुमत नाही. तुम्हाला उपदेश करायला आलेलो नाही. तुम्ही करताहेत ती धर्माची समस्या आहे. तुमच्या तपश्चर्येला शंभर टक्के यश येणार आहे. तुम्ही फक्त ते राजकारणी आहेत म्हणून बिचकू नका. जो शब्द ते देतील, तो पाळून घेण्याचं काम माझ्याकडे सोपवा”, असे संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना सांगितलं.
ADVERTISEMENT
संभाजी भिडेंचे आवाहन… जिजाऊंचा निरोप
“ही लढाई आहे. एक घाव दोन तुकडे अशी ही लढाई नाही. तुमचा जो आग्रह आहे, त्या बाजूने ही लढाई यशस्वी होईल. तुम्ही हे उपोषण मोठ्या मनाने थांबवा. मी तुम्हाला नाउमेद करायला आलेलो नाही. या उपोषणाचा जो उद्देश आहे, तो यशस्वी होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. अजिबात शंका घेऊ नका. माझी कळकळीची प्रार्थना आहे की, तुम्ही उपोषण थांबवावं. लढा थांबवू नये. हा जिजा माऊलींचा, शहाजीराजेंचा तुम्हाला आलेला निरोप आहे, असं समजून तुम्ही हे आंदोलन थांबवावं”, असे आवाहन संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना केले.
ADVERTISEMENT