Pune Lok Sabha : स्वरदा बापटांची एन्ट्री, भाजपतील कुणाचा पत्ता कटणार?
पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यास गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून कोणत्या नेत्यांचा पत्ता कट होणार?
ADVERTISEMENT
Pune Lok Sabha Bypoll election : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं मार्चमध्ये निधन झालं. गेल्या वर्षभरापासून बापट रुग्णालयात उपचार घेत होते. बापटांच्या निधनानंतर पुण्यातली लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. ही जागा रिक्त झाल्यानंतर या जागेवर भाजपमधूनच अनेकांनी दावेदार आहेत. आता या सगळया दाव्यांमध्ये बापट यांच्या सून स्वरदा बापट यांची देखील एन्ट्री झाली आहे. स्वरदा बापट या पुण्याची लोकसभेची जागा लढवण्यास इच्छुक असून, तशी इच्छा त्यांनी देखील व्यक्त केली आहे. आता स्वरदा बापट यांच्या एन्ट्रीमुळे पुण्याचं राजकारण कसं बदलणार आहे, हेच आपण समजावून घेऊयात…
ADVERTISEMENT
पुढे जाण्याआधी आत्तापर्यंत पुण्याच्या लोकसभेच्या जागेवरुन काय काय घडलं आहे ते पाहुयात. 29 मार्चला गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यानंतर एक दोन दिवसातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्याची जागा मविआ लढणार असं म्हंटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यावर अजित पवार यांनी देखील तिखट प्रतिक्रिया दिली होती. अशातच पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यकर्त्याने भावी खासदार असा फ्लेक्स लावला होता.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक : भाजपतून कोण आहे इच्छुक?
या फ्लेक्सवरुन देखील मोठं राजकारण रंगलं होतं. एकेकाळी काँग्रेसचा गड असणारा पुणे लोकसभा मतदारसंघ सुरेश कलमाडींनंतर भाजपच्या ताब्यात गेला. कलमाडींनंतर अनिल शिरोळे हे पुण्याचे खासदार झाले आणि त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीमध्ये गिरीश बापटांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. आता बापट यांचं निधन झालानंतर भाजमधील अनेकजण निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नवनीत राणांविरोधात सुषमा अंधारे उतरणार मैदानात?
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव या शर्यतीमध्ये अग्रक्रमाने घेतलं जातं. मोहोळ यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात अनेक कामं केली आहेत. त्याचबरोबर त्यांचं संघटन कौशल्य देखील चांगलं आहे. त्यामुळे मोहोळ यांचं नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर भाजपचे राज्याचे सरचिटणीस म्हणून देखील त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा >> ‘हे’ 5 फॅक्टर अन् सिद्धरामय्या डीके शिवकुमार यांना ठरले वरचढ
यातच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पूर्व पुण्यामध्ये भाजपला वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या देखील ते जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाची देखील नेहमीच चर्चा होत असते. मुळीक यांच्याबरोबरच राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे हे देखील इच्छुक आहेत.
ADVERTISEMENT
स्वरदा बापटांमुळे कुणाचा पत्ता कट होणार?
अशातच आता स्वरदा बापट यांनी देखील पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा बोलून दाखवली आहे. विविध माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. लोकमत वृत्तपत्राशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘शहर लोकसभेची रिक्त जागा लढवण्याबाबत आपली तयारी आहे, पक्ष ठरवेल ते मला मान्य आहे. मी यापूर्वी सांगली महापालिकेत नगरसेवक होते. विवाहानंतर बापट यांच्या घरात आल्यावर आता शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. पक्षाने लोकसभेसाठी संधी दिली तर माझी तयारी आहे.’
ADVERTISEMENT
हेही वाचा >> संजय पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, ‘ती’ जाहिरातबाजी भोवली
त्यामुळे स्वरदा बापट देखील आता पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. स्वरदा बापट या गिरीश बापट यांच्या सून आहेत. त्याचबरोबर पुणे भाजपच्या त्या उपाध्यक्षा देखील आहेत. या आधी त्यांनी सांगली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यामुळे राजकारणाचा त्यांना अनुभव आहे.
पोटनिवडणूक बिनविरोध होणार का?
आता पुणे लोकसभेची जागा बिनविरोध होणार का असा देखील प्रश्न आहे. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही निवडणुक बिनविरोध करण्याची चर्चा होती. परंतु भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याने मविआने हि निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला आणि विजयी देखील झाले. त्यामुळे यावेळी भाजप काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. त्यातच एका जागेसाठी अनेक दावेदार असल्याने भाजप नेतृत्व कोणला संधी देणार असा देखील प्रश्न आहे. आता स्वरदा बापट यांनी स्वतःच निवडणुक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितल्याने इतर इच्छुकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप पुण्याच्या लोकसभेच्या जागेबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT