'तुझ्या नातलगांमध्ये माझी मुलगी देणार नाही..' बाप अन् आईचा वाद; अखेर कुणाचा बळी गेला?
गेल्या एका महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 17 वर्षांच्या मुलीची तिच्याच वडिलांनी निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यासाठीही वडील गेले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तुझ्या नातलगांमध्ये माझी मुलगी देणार नाही..
बापाचा आईसोबत वाद;
अखेर कुणाचा बळी गेला?
Crime News : कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरा तालुक्यातील निंबेमरदहल्ली गावात गेल्या एका महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 17 वर्षांच्या मुलीची तिच्याच वडिलांनी निर्घृण हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. थिम्मरायप्पा असे आरोपी वडिलांचे नाव असून, कौटुंबिक वादातून आणि मुलीच्या लग्नाच्या कारणावरून घरात वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
आई मजुरीवरुन घरी परतली अन्...
या घटनेतील मृत मुलीची ओळख 17 वर्षीय मेघना म्हणून झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी मेघना अचानक बेपत्ता झाली होती. तिची आई निर्मला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मजुरीवरून घरी परतली, तेव्हा तिला मेघना घरात दिसली नाही. निर्मला यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. संशयास्पद परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
हे ही वाचा : CA सोबत आंतरजातीय विवाह, छळ आणि ज्योतिषी.. 24 वर्षीय जागृतीचं आयुष्य कसं संपलं?
मेघनाच्या लग्नावरुन वाद
मेघनाच्या लग्नाच्या विषयावरून या कुटुंबात गेल्या 4-5 महिन्यांपासून सतत वाद सुरू होते. आई निर्मला आणि तिच्या माहेरचे नातेवाईक मेघना 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न एका नातेवाईकाच्या मुलाशी करून देण्याच्या तयारीत होते. मुलाकडच्यांनी लग्नासाठी साड्या आणि मंगळसूत्रही खरेदी केले होते. मात्र, वडील थिम्मरायप्पा यांचा आपल्या पत्नीच्या नातेवाईकांमध्ये मुलीचे लग्न लावण्यास तीव्र विरोध होता. अशाच एका मोठ्या वादाच्या दुसऱ्याच दिवशी मेघना बेपत्ता झाली आणि त्यानंतर काही दिवसांत थिम्मरायप्पा देखील गायब झाल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
हे ही वाचा : चॅट पाहताच पारा चढला, बॉयफ्रेंडनं बीएच्या तरूणीला उसाच्या शेतात नेत..
वडिलांनीच केली हत्या
कल्लाम्बेला पोलिसांनी जेव्हा थिम्मरायप्पाला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, थिम्मरायप्पाने आधी मेघनाला एका विहिरीत ढकलले आणि नंतर तिच्यावर दगडफेक केली. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने तिचा मृतदेह बाहेर काढून एका निर्जन ठिकाणी पुरून टाकला. विशेष म्हणजे, स्वतःच मुलीची हत्या केल्यानंतर संशयाची सुई आपल्यावर येऊ नये म्हणून थिम्मरायप्पा पत्नीसोबत पोलीस ठाण्यात गेला होता आणि तिची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यास मदत केली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.









