Exclusive: अजित पवारांसह 9 जणांची आमदारकी जाणार?, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान…
अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय पक्ष कोण, आमदार अपात्रतेचं काय होणार.. यासारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सगळ्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई Tak सोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत करताना मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: एकीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्न प्रलंबित असतानाच आता राष्ट्रवादीच्या 9 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर (Rahul Narvekar) आलं आहे. त्यामुळे अजित पवारांसह (Ajit Pawar) 9 जणांची आमदारकी देखील धोक्यात आली आहे. असं असताना नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याचविषयी मुंबई Tak चे (Mumbai Tak) मुख्य संपादक साहिल जोशी यांनी राहुल नार्वेकरांशी एक्सक्लुझिव्ह चर्चा केली. (ajit pawar revolt political party mla disqualification vidhan sabha speaker rahul narwekar big statement exclusive interview mumbai tak)
‘आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याबाबत मला फार घाई करायची नाहीए. पण मला निर्णय देताना कोणताही उशीर करायचा नाही.. पण घिसाडघाई करून अन्याय होईल असा निर्णय देखील द्यायचा नाही.’ असं विधान राहुल नार्वेकरांनी केलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत:
प्रश्न: शुक्रवारी अजित पवारांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर विधीमंडळ नेतेपदावरुन जयंत पाटलांना हटवून अजित पवारांची निवड करण्यात आल्याचं पत्र आपल्याकडे देण्यात आलं. या सगळ्या प्रकरणाबाबत आपल्याला काय वाटतं?
राहुल नार्वेकर: आजची जी राजकीय परिस्थिती आहे त्या विधीमंडळात जो गट आहे त्यापैकी कोणत्याही गटाने माझ्याकडे असं कोणतंही निवेदन दिलेलं नाही की, पक्षात कोणत्याही प्रकारची फूट पडलेली आहे. त्यामुळे आज माझ्यासमोर राष्ट्रवादी विधीमंडळ पक्ष आहे तो आतापर्यंत एकच गट असल्याचं दिसतं आहे. केवळ नेतृत्वाबद्दल वाद आहे. असं चित्र माझ्यासमोर ठेवण्यात आलं आहे. जर नेतृत्वाबाबत वाद असताना आम्ही निर्णय घेताना कोणाला अधिकृत पक्षाचा नेता मानतो ते आम्हाला ठरवावं लागेल. ते ठरवल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत येऊ शकू की त्या राजकीय पक्षाच्या नेमक्या मागण्या काय आहेत, कोण प्रतोद बनलं पाहिजे, कोण गटनेतं बनलं पाहिजे.. ते ठरवलं जाईल.
माझ्याकडे यासंबंधी अनेक पत्रं समोर आली आहेत. त्यामुळे याबाबत सचिवालयात आकलन केलं जात आहे.
आमच्याकडे 1-2 अपात्रतेची प्रकरणं समोर आली आहे.महत्त्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांना पक्षाच्या वतीने विरोधी पक्ष नेता नियुक्त करण्याची मागणी आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, विरोधी पक्ष नेत्याला नियुक्त करण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. विधानसभेचे नियम आहेत जसं की, विरोधी पक्षाचे नेमके किती आमदार आहेत हे पाहणं, वैगरे..
सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागेल की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझ्यासमोर आहे. एकतर मला तो पक्ष विरोधी पक्ष आहे असं ठरवावं लागेल किंवा ते सत्ताधारी पक्षात आहेत हे ठरवावं लागेल. एकाच पक्षाला मी विभागू शकत नाही. त्यानंतर आम्ही हे देखील पाहू की, राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाचं नेतृत्व कोण करतंय. त्या पक्षाच्या नेत्याने पक्ष घटनेनुसार आमच्याकडे जे निवेदन दिलं असेल.. त्यानुसार आम्ही पुढचे निर्णय घेऊ.
प्रश्न: विरोधी पक्ष नेता आणि व्हीप बदल्याण्याबाबत जयंत पाटलांकडून आपल्याकडे जे पत्र पाठविण्यात आलं ते पुरेसं नाही का?