आमदार हसून हसून बेजार! जयंत पाटलांनी सांगितला नारायण राणे आणि सूट शिवण्याचा किस्सा
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या ठरावावर बोलताना जयंत पाटलांनी नारायण राणे आणि त्यांच्या घडलेला एक जुना किस्सा सांगितला. जयंत पाटलांनी सांगितला किस्सा ऐकून सगळे आमदार हसून हसून बेजार झाले.
ADVERTISEMENT
Jayant Patil News : काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षनेत्याच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावावर बोलताना जयंत पाटलांनी नारायण राणे आणि त्यांच्या घडलेला एक जुना किस्सा सांगितला. जयंत पाटलांनी सांगितला किस्सा ऐकून सगळे आमदार हसून हसून बेजार झाले.
विरोधी पक्षनेत्याच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “विरोधी पक्षाच्या वतीने एक झुंजार, खंबीर नेता तिथे बसला आहे. विरोधी पक्षनेते म्हणून ते महाराष्ट्राच्या प्रश्नांना न्याय देतील. राजकीय संस्कृतीत फार मोठे बदल महाराष्ट्रात यायला लागले आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवली गेली आहे.”
नारायण राणेंचा होता दरारा
– “अनेक प्रश्नांना या खुर्चीने न्याय दिलेला आहे. नारायण राणे यांचा मी उल्लेख करेन. नारायण राणे असे विरोधी पक्षनेते होते की, त्यांनी नुसतं डावीकडे बघितलं, तरी सगळं सैन्य खाली बसायचं. एवढा त्यांचा दरारा होता. त्यांनी वळून बघितलं की, विरोधी पक्षातील आमदार अर्ध्या सेंकदात खाली बसायचे”, असं जयंत पाटील म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीत बसले अजित पवार; नार्वेकरांनी काय केले?
– “नारायण राणेंचा विषयाचा अभ्यासही मोठा होता. एखादा विषय बघितला की, एवढा खोल अभ्यास करायचे… सभागृहात त्यांनी अनेक भाषणं केली. मी त्यावेळी अर्थमंत्री होतो. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांचं भाषण प्रचंड अभ्यासू असायचं. त्याची उत्तर देण्याचं काम आम्ही करायचो, पण त्यांचं भाषणं मात्र उत्कृष्ट असायचं. त्यावेळी असं वाटायचं की काय जयंत पाटलांनी अर्थसंकल्प मांडलाय. हे सगळं चुकीचंच मांडलेलं आहे. इतका प्रभाव ते भाषणातून तयार करायचे”, अशी आठवण जयंत पाटील यांनी राणेंबद्दल सांगितली.
वाचा >> Prakash Ambedkar : “शरद पवारांनी, ब्रेकअप स्टंट करून जनतेला मुर्ख बनवू नये”
– “एकनाथ खडसेही तसेच होते. दोघांची जोरात बोलण्याची ढब होती. मला आठवत की, विरोधी पक्षाचा आणि सत्तारुढ पक्षाचा संबंध सौहार्दपूर्ण असला पाहिजे. विरोधी पक्षासोबत सत्तारुढ पक्षाने चांगलं वागलं पाहिजे. आपुलकीने वागलं पाहिजे. त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. पण, विरोधी पक्षनेत्याने सत्तारुढ पक्षाची कशी काळजी घेतली पाहिजे याचं उदाहरण मी सांगेन”, असं सांगत जयंत पाटलांनी नारायण राणेंनी शिवून पाठवलेल्या कोटचा किस्सा सांगितला.
ADVERTISEMENT
जयंत पाटील, नारायण राणे आणि कोट
“मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो. क्रिकेटची मॅच चार वाजता होती. त्यामुळे त्यावेळी अध्यक्ष असलेल्या अरुण गुजरातींना विनंती केली की, मला अर्थसंकल्प लवकर मांडायला द्या. कारण मॅच सुरू झाल्यावर कुणीही अर्थसंकल्प बघणार नाही. ते म्हटले, ‘जयंतराव विरोधी पक्षनेत्याशी बोललं पाहिजे.”
ADVERTISEMENT
“नारायण राणेंना फोन केला. त्यांना विचारलं तर ते म्हणाले, ‘जयंत तू म्हणशील ती वेळ. ते जाऊ दे पण, कपडे काय घालणार सांग?’ मी त्यांना म्हटलं कपडे काय… शर्ट पँट. कारण त्यावेळी मी वजन बरंच कमी केलेलं होतं. त्यांना म्हटलं काही बसेना झालंय. ते म्हणाले, ‘नाही… नाही. महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटात आणि बुटात आला पाहिजे.’ त्यांना मी सांगितलं की, साहेब बसत नाही. साईज बिघडलीये. ते म्हणाले, ‘ठिक आहे.”
वाचा >> नितीन देसाईंची पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदेंना विनंती; 11 ऑडिओ क्लिपमध्ये काय?
“त्यानंतर अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी मी माझ्या दालनात आलो. तर तिथे टेलर हजर. तो सारखा हात लावायचा. मी म्हटलं, अंगाला हात लावायचा नाही. मी काही माप देणार नाही. तर तो सारखा ‘नाही साहेब. आम्हाला साहेबांनी (नारायण राणे) सांगितलं आहे.’ त्यानंतर बळजबरीने माप घेतलं. दुसऱ्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला तो नारायण राणेंनी शिवून दिलेला कोट घालून. मला हेच सांगायचं की, सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचा संबंध अतिशय मधूर असला पाहिजे”, असा किस्सा जयंत पाटलांनी सांगितला आणि सगळेच गदगदून हसले.
ADVERTISEMENT