कधीकाळी 32 मतांनी निवडणूक जिंकून आमदार झाले, भाजपने विधानपरिषदेची संधी दिलेले प्रमोद जठार कोण आहेत?
Pramod Jathar Profile Story : भाजपने मंगळवारी रात्री विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोकणातील नेते प्रमोद जठार यांच्या नावाचा समावेश आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कधीकाळी 32 मतांनी निवडणूक जिंकून आमदार झाले
भाजपने विधानपरिषदेची संधी दिलेले प्रमोद जठार कोण आहेत?
Pramod Jathar Profile Story : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण निवडणुकीसाठी पक्षाने आपल्या अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली असून, यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक ,संजय भेंडे, प्रमोद जठार यांचा समावेश आहे. याशिवाय विवेक कोल्हे यांना देखील भाजपने विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, भाजपने संधी दिलेले प्रमोद जठार कोण आहेत? आणि त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिलीये? जाणून घेऊयात...
प्रमोद जठार कोण आहेत?
भाजपचे कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची लॉटरी लागली असून भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच नावांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 2009 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार रविंद्र फाटक यांचा अवघ्या 32 मतांनी पराभव करत प्रमोद जठार कणकवलीतून विधानसभेत पोहोचले होते. मात्र 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार नितेश राणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर जठार यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पदही सांभाळत संघटनात्मक कामकाजात सक्रिय भूमिका बजावली. शिवाय, कोकणातील वादग्रस्त प्रकल्पांचे समर्थन करताना पाहायला मिळतात. आता विधानपरिषदेत त्यांच्या रूपाने कोकणाला पुन्हा एक प्रतिनिधित्व मिळणार असून भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
विधानपरिषदेची संधी मिळाल्यानंतर प्रमोद जठार काय म्हणाले?
प्रमोद जठार म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आणि भाजपच्या सर्व नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला यावेळी विधानपरिषदेची उमेदवारी दिली. कोकणात काम करण्याची संधी माझ्या पक्षाने दिली. पक्षाचं लक्ष असतं, श्रद्धा आणि सबुरीची गरज असते. असाच विश्वास आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मी माझ्या सगळ्या नेत्यांचा आभारी आहे.









