Rahul Gandhi: ‘शाहा, अदाणी अन् रावण…’, लोकसभेत परताच तुफान हल्ला, भाषण जसंच्या तसं

रोहित गोळे

ADVERTISEMENT

rahul gandhi speech as it is he criticized pm modi during his no confidence motion against modi government
rahul gandhi speech as it is he criticized pm modi during his no confidence motion against modi government
social share
google news

Rahul Gandhi Speech: नवी दिल्ली: लोकसभेत मोदी सरकारविरोधात जो अविश्वास प्रस्ताव (no-confidence motion) आणण्यात आला आहे त्याच चर्चेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सहभाग घेतला. खासदार राहुल गांधी हे तब्बल 139 दिवसांनी लोकसभेत परतले. त्यामुळे ते नेमकं काय भाषण करणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान, राहुल गांधींनी अतिशय आक्रमकपणे लोकसभेत भाषण केलं. ज्यामध्ये त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर (PM Modi) हल्ला चढवला. वाचा राहुल गांधींचं आजचं (9 ऑगस्ट) लोकसभेतील संपूर्ण भाषण. (rahul gandhi speech as it is he criticized pm modi during his no confidence motion against modi government)

ADVERTISEMENT

अविश्वास प्रस्ताव: राहुल गांधींचं लोकसभेतील संपूर्ण भाषण जसंच्या तसं…

सगळ्यात आधी मी आपले आभार मानतो.. तुम्ही मला पुन्हा लोकसभेत येऊ दिलं. मागच्या वेळेस मी जेव्हा बोललो तेव्हा मी तुम्हाला थोडं दु:खही दिलं. कारण की मी एवढ्या जोराने अदाणींवर फोकस केलं की, जे तुमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना बरंच वाईट वाटलं. पण.. त्यांना जे वाईट वाटलं.. त्याचा परिणाम तुमच्यावर देखील जाणवला म्हणून मी तुमची माफी मागतो. पण मी फक्त सत्य समोर ठेवलं होतं.

आज जे माझे भाजपचे मित्र आहेत. आज तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आज माझं जे भाषण आहे ते अदाणींवर नाहीए.. तर तुम्ही आरामात आणि शांत बसा.. कारण की माझं भाषण आज दुसऱ्या दिशेने जाणार आहे. रुमीने म्हटलं होतं की, ‘जे शब्द मनापासून येतात ते मनापर्यंत पोहचतात..’ तर आज मी मनापासून बोलू इच्छितो..

मी आज तुमच्यावर फार आक्रमण करणार नाही.. एक-दोन तोफगोळे जरुर डागेल.. पण फार नाही.. तर तुम्ही आरामात राहा..

मागील वर्षी 130 दिवसांसाठी मी भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलो. एकटा नाही.. खूप सगळे माझ्यासोबत होते. मी समुद्राच्या तटापासून ते काश्मीरच्या बर्फाळ डोंगरापर्यंत चाललो.. लडाख मी सोडलं नाही.. यात्रा अजून संपलेली नाही.. आणि जरूर लडाखला येईन.. घाबरू नका. अनेक लोकांनी मला विचारलं की, राहुल तू का चालतोयस.. तुझं लक्ष्य काय आहे?

कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत का जात आहे? जेव्हा ते मला विचारायचे.. सुरुवातीला मला उत्तर देता यायचं नाही.. मलाच माहीत नव्हतं की, मी ही यात्रा का सुरू केली.. जेव्हा मी कन्याकुमारीपासून सुरुवात केली तेव्हा मी विचार करत होतो की मला हिंदुस्तान पाहायचा आहे.. हिंदुस्तान समजून घ्यायचा आहे.. लोकांमध्ये जायचं आहे.. पण गहिरेपणाने मला माहीत नव्हतं.

थोड्या काळाने मला गोष्ट समजू लागली.. ज्या गोष्टीबाबत मला प्रेम होतं.. ज्या गोष्टीसाठी मी मरण्यासाठी तयार आहे.. ज्या गोष्टीसाठी मी मोदीजींच्या तुरुंगात जायला तयार आहे. ज्या गोष्टीसाठी मी दहा वर्ष दररोज शिव्या खाल्ल्या.. त्या गोष्टी मला समजून घ्यायच्या होत्या. हे आहे तरी काय.. ज्याने माझ्या मनाला एवढ्या मजबुतीने पकडून ठेवलं होतं त्याला मला समजून घ्यायचं होतं.

सुरुवातीला.. जसं मी सुरू केलं अनेक वर्ष मी आठ-दहा किमी धावतो. पण माझ्या डोक्यात होतं तर 10 किमी धावतो तर 25 किमी चालणं फार काही मोठी गोष्ट नाही.. असा मी विचार केला होता.. आज मी त्या भावनेकडे पाहतो तर तो माझा अहंकार होता.. पण भारत अंहकाराला एकदम संपवून टाकतो.. एका सेकंदात संपवून टाकतो.. तर झालं काय.. दोन-तीन दिवसात माझ्या गुडघ्यात दुखू लागलं.. जुनं दुखणं होतं आणि जबरदस्त दुखायचं..

जेव्हा मी उठायचो.. आणि माझ्या गुडघ्यात दुखायचं.. प्रत्येक पावलासरशी दुखायचं.. पहिल्या दोन-तीन दिवसात जो अंहकार होता.. जो अंहकार घेऊन हिंदुस्तान पाहण्यासाठी निघालो होतो तो सगळा अंहकार गायब झाला.. रोज मी घाबरून चालत होतो की, मी उद्या चालू शकेन की नाही?

जेव्हा ही भीती वाढायची कुठून ना कुठून कोणती ना कोणती शक्ती माझी मदत करायची.. एके दिवशी मी दुखणं सहन करू शकत नव्हतो.. त्यावेळी एक छोटी मुलगी आली आणि तिने एक चिठ्ठी दिली. मी चिठ्ठी उघडली.. ती मुलगी आठ वर्षांची होती.. त्या चिठ्ठीत लिहलं होतं की.. राहुल मी तुमच्याबरोबर चालणार आहे.. काळजी करू नका..

तिने माझ्या पायाला झालेली दुखापत पाहिली आणि तिने तिची शक्ती मला दिली.. फक्त तिनेच नाही तर लाखो लोकांनी मला त्यांची शक्ती दिली. सुरुवातीला मी जेव्हा चालायचो तेव्हा शेतकरी यायचे तेव्हा मी त्याला माझी गोष्ट सांगायचो… की, तुम्ही असं करायला हवं.. अशा पद्धतीने काम करायला हवं. पण एवढे लोकं आले.. हजारो लोकं आले की थोड्या काळाने मी बोलू शकलो नाही. जे माझ्या मनात होतं ते मी बोलूच शकलो नाही.. कारण एवढी लोकं होती..

लोकांचा आवाज सतत होता.. भारत जोडो.. भारत जोडो.. जे माझ्याशी बोलायचे त्यांचा आवाज मी ऐकायचो.. दररोज सकाळी 6 ते रात्री 7-8 वाजेपर्यंत सामान्य माणूस गरीब, श्रीमंत, उद्योजक, शेतकरी, कामगार सगळ्यांचा आवाज ऐकायचो.

हे चालू होतं.. लोकांचं ऐकत होतो.. आणि एके दिवशी माझ्याकडे एक शेतकरी आला.. त्याने माझ्या डोळात पाहून रुईचं बंडल माझ्या हातात दिलं.. आणि सांगितलं… हेच माझ्या शेतात उरलं आहे. मी त्याला प्रश्न विचारत होतो की, भाई तुला विम्याचे पैसे मिळाले का? तो शेतकरी म्हणाला की, विम्याचे पैसे मिळाले नाही. हिंदुस्तानच्या मोठ्या उद्योगपतीने ते हिसकावून घेतले.

पण यावेळी एक विचित्र गोष्ट घडली.. जेव्हा मी शेतकऱ्याला पाहिलं तो माझ्याशी बोलत होता.. तेव्हा त्याच्या मनात जे दु:ख होते ते माझ्या मनात आलं. जी त्याच्या डोळ्यात शरम होती.. जेव्हा तो आपल्या बायकोशी बोलायचा.. ती शरम माझ्या डोळ्यात आली. त्याची जी भूक होती ती मला समजू लागली.. त्यानंतर यात्रा एकदम बदलली..

मला लोकांचा आवाज ऐकू येत नव्हता.. मला फक्त त्या व्यक्तीचा आवाज ऐकू यायचा जो माझ्याशी बोलायचा.. त्याचं दु:ख, माझं दु:ख बनलं..

लोकं म्हणतात.. की हा देश आहे.. कोण म्हणतं.. या वेगवेगळ्या भाषा आहेत. कोणी म्हणतं ही जमीन आहे.. माती आहे.. कोणी म्हणतं हा धर्म आहे.. सोनं आहे, चांदी आहे.. पण बंधू-भगिनींनो सत्य हे आहे की हा देश एक आवाज आहे.. हा देश फक्त एक आवाज आहे.. या देशाच्या लोकांचा आवाज आहे..

जर आपल्याला हा आवाज ऐकायचा आहे तर आमच्या मनात जो अंहकार आहे, आमची जी स्वप्नं आहेत ती बाजूला ठेवायला हवीत.. आपली स्वप्नं जेव्हा आपण बाजूला ठेवू तेव्हा आपल्याला हिंदुस्तानचा आवाज ऐकू येईल. नाहीतर तोवर हिंदुस्तानचा आवाज ऐकू येणार नाही.. आता तुम्ही म्हणाल की, मी ही गोष्ट अविश्वास प्रस्तावात का मांडली? याचा काय अर्थ आहे की, भारत एक आवाज आहे.. भारत लोकांचं दु:ख आहे..

भारत हा एक आवाज आहे.. जर आपल्याला तो आवाज ऐकायचा असेल तर.. आपल्याला अंहकार आणि द्वेष मिटवावा लागेल.. काही दिवसांपूर्वीच मी मणिपूरला गेलो.. आपले पंतप्रधान नाही गेले.. आजवर गेलेले नाही.. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हा हिंदुस्तान नाहीए. मी मणिपूर शब्दप्रयोग केला.. पण आजचं सत्य हे आहे की, मणिपूर शिल्लक राहिलेलं नाही.. मणिपूरला आपण दोन भागात विभागलं आहे, तोडलं आहे..

मी मणिपूरमध्ये मदत छावणीमध्ये गेलो.. मी महिलांशी बोललो, मुलांशी बोललो.. जे आपले पंतप्रधानांनी नाही केलं.. मी अनेक महिलांशी तिथे बोललो.. पण मी दोन उदाहरणं देतो.. एका महिलेला मी विचारलं की, तुमच्यासोबत काय झालं? ती महिला म्हणाली, माझा एकच छोटा मुलगा होता. माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी घातली. आपण विचार करा.. आपल्या मुलांबाबत विचार करा..

मी संपूर्ण रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ झोपून होते. (खोटं.. सत्ताधारी पक्षातील खासदाराने यावर टिप्पणी केली.. त्यावर राहुल गांधी म्हणाले, खोटं नाही.. खोटं तुम्ही बोलतात.. मी नाही..)

मी त्याच्या मृतदेहासोबत झोपून राहिले.. नंतर मला भीती वाटली, मी माझं घर सोडलं. जे माझ्याजवळ होतं, ते सगळं सोडून दिलं. मी त्या महिलेला विचारलं काहीतरी आणलं असेल? त्या महिलेनं सांगितलं, काहीच नाही. माझ्याजवळ फक्त कपडे आहेत. तिने इकडे तिकडे शोधलं आणि एक फोटो दाखवला आणि म्हणाली इतकंच माझ्याजवळ राहिलं आहे.

आणखी एक उदाहरण.. मी दुसऱ्या मदत छावणीत गेलो. मी त्या महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय झालंय? मी प्रश्न विचारताच ती महिला थरथरायला लागली. तिच्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहिले आणि ती बेशुद्ध झाली. माझ्यासमोर ती बेशुद्ध झाली.. मी फक्त ही दोन उदाहरणे दिली आहेत.

अध्यक्ष महोदय, यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केलीये फक्त मणिपूरची नाही. यांच्या राजकारणाने मणिपूरला नाही तर भारताला मणिपूरमध्ये मारलंय. भारताची हत्या केलीए, भारताचा खून केला आहे मणिपूरमध्ये.. (यानंतर सत्ताधारी आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. तर विरोधी आमदार देखील वेल उतरले.)

जसं मी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणालो की, भारत एक आवाज आहे. त्या आवाजाची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. याचा अर्थ भारतमातेची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारलं. मणिपूरच्या लोकांना मारुन तुम्ही भारताची हत्या केली आहे. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही देशभक्त नाही.. तुम्ही देशप्रेमी नाही तर देशद्रोही आहात. तुम्ही देशाची हत्या मणिपूरमध्ये केली.

यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही. कारण त्यांनी देशाची हत्या केली आहे मणिपूरमध्ये.. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही भारतमातेचे रक्षणकर्ते नाही आहात.. आपण भारतमातेचे खुनी आहात..

मी माझ्या मातेच्या हत्येबाबत बोलतोय… मी मणिपूरमध्ये माझ्या मातेच्या झालेल्या हत्येबाबत बोलतोय. मी आदराने बोलतोय.. आपण माझ्या आईची हत्या केलीए मणिपूरमध्ये.. एक माझी आई इथे बसली आहे आणि दुसऱ्या आईला आपण मणिपूरमध्ये मारलं आहे.

जोपर्यंत आपण हिंसा बंद करणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात.. भारताचं लष्कर मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकतं. पण तुम्ही भारताच्या लष्काराचा वापर करत नाही. कारण तुम्हाला भारताला मणिपूरमध्ये मारुन टाकायचं आहे.

जर नरेंद्र मोदीजी हे भारताचा आवाज ऐकत नाही.. जर भारताच्या मनातली गोष्ट ऐकत नाही.. तर कोणाचा आवाज ऐकतात? तर दोन लोकांचा आवाज ऐकतात.. यांचा आवाज ऐकतात.. यासाठी ऐकतात कारण.. पाहा अदानींसाठी मोदींनी काय काम केलंय.. पाहा.. हे पहिले आणि हे नंतर.. (यावेळी राहुल गांधींनी काही पोस्टर दाखवले.. ज्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला.)

रावण फक्त दोनच लोकांचं ऐकायचा.. एक मेघनाथ आणि दुसरं कुंभकर्णाचं.. तसंच नरेंद्र मोदी हे दोन लोकांचं ऐकतात.. अमित शाह आणि अदाणी.. लंकेला हनुमानाने नव्हतं जाळलं.. लंकेला रावणाच्या अंहकाराने जाळलं होतं.

रामाने रावणाला नव्हतं मारलं… रावणाच्या अंहकाराने रावणाला मारलं होतं. आपण संपूर्ण देशावर रॉकेल फेकत आहात.. तुम्ही मणिपूरवर रॉकेल फेकलं आणि नंतर आग लावली.. आता आपण हरियाणामध्ये तेच करत आहात.. संपूर्ण देश आपल्याला जाळून टाकायला सुरुवात केली आहे. तुम्ही संपूर्ण देशात भारतमातेची हत्या करत आहात.. असं जोरदार भाषण राहुल गांधींनी केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT