"देवेंद्र फडणवीस.., तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशय..", अशोक खरात प्रकरणी राज ठाकरेंची प्रतिक्रिया
Raj Thackeray on Ashok Kharat Case : नाशकातील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विकृत कृत्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल देखील केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"देवेंद्र फडणवीस.., तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशय.."
अशोक खरात प्रकरणी राज ठाकरेंची प्रतिक्रिया
Raj Thackeray on Ashok Kharat Case : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याचे विकृत कृत्य राज्यात चर्चेत आहेत. त्याने अंधश्रद्धा आणि अघोरी कृत्यांचा वापर करुन अनेक महिलांचं शोषण केल्याचं समोर आलं आहे. आत्तापर्यंत त्यांच्याविरोधात 3 गंभीर स्वरुपाच्या FIR दाखल झाल्या आहेत. अनेक राजकारणी अशोक खरात याला आपला गुरु मानत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. दरम्यान, या प्रकरणात पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत या प्रकरणाबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.
राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.










