अजितदादांनी केले हात वर, मग कुणाला हवेत सूरज चव्हाण? NCP मध्ये अजित पवारांना कोण ठरतंय सरस?
NCP Suraj Chavan: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने सूरज चव्हाण यांची थेट पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे यावरून बरीच टीका सुरू आहे. मात्र, याबाबत असलेलं नेमकं राजकारण काय यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला भीषण मारहाण झाली. याचे व्हिडीओही समोर आले. अजितदादांच्या राष्ट्रवादी युवकचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे यात मारहाण करताना दिसले. यानंतर टीकेची झोड उठली. आणि अजितदादांनी तातडीने दखल घेतली. 'घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.' असं म्हणत अजितदादांनी सूरज चव्हाणांची पदावरुन हकालपट्टी केली होती.
असं असताना आता अचानक पुन्हा सूरज चव्हाणांना मोठं पद देण्यात आलं. याचं पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह अजितदादांच्या नेत्यांनी सूरज चव्हाण यांना दिलं आहे. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन वर्तन करणाऱ्या सूरज चव्हाणांना पक्षाच्या वाढीसाठी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा>> "राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय आता...", शरद पवार नेमकं काय म्हणाले?
आता हे एकूण प्रकरणच रंगलं. काहीजण अजितदादांवर आरोप करत आहेत. तर काही जण अजितदादांच्या पक्षात दोन गट पडले आहेत असं म्हणत आहेत. तर काही जणांना अजितदादांची प्रतिमा खराब करण्याचा हा डाव वाटतो आहे.
‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का', रोहित पवारांची बोचरी टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार रोहित पवारांनी यावर एक पोस्ट केली आहे. 'लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?'