‘एनडीए अमिबा, मोदींची जेवणावळ’; INDIA च्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंचा पहिला हल्ला
विरोधकांच्या बैठकीनंतर भाजपने एनडीएची बैठक घेतली. यावरून ठाकरेंनी मोदींना चिमटा काढलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेल्या ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut : शिवसेनेतील बंडखोरीला वर्ष झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एका बंडखोर आमदार, खासदारांवर निशाणा साधला. दुसरीकडे विरोधकांच्या बैठकीनंतर भाजपने एनडीएची बैठक घेतली. यावरून ठाकरेंनी मोदींना चिमटा काढलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेल्या ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली.
शिवसेनेतील बंडखोर आमदार, खासदारांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात. तरीदेखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं, हे आपल्याच सोबत आहेत.”
निवडणूक आयोग आणि शिवसेनेचा फैसला
उद्धव ठाकरे असंही म्हणाले की, “निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, ‘शिवसेना’ हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल.”
मोदींना टोला, एनडीएच्या बैठकीबद्दल ठाकरे काय म्हणाले?
“बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए‘ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची ‘इंडिया’ नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या ठेवणीतल्या. आणि छत्तीस पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली”, असा टोला ठाकरेंनी लगावला.