Govt Jobs : देशसेवेची संधी, अग्निवीर वायू पदांची भरती सुरु, लगेच करा अर्ज
भारतीय हवाई दलात (IAF) 'अग्निवीर वायु' पदांची भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै आहे. यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Govt Jobs : देशसेवेची संधी,
अग्निवीर वायू पदांची भरती सुरु
लगेच करा अर्ज
IAF Recruitment : भारतीय हवाई दलात (IAF) 'अग्निवीर वायु' पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै आहे. संपूर्ण भारतात कुठेही नोकरी मिळण्याची ही सुवर्णसंधी असून, यासाठी 550 रुपये अधिक जीएसटी (GST) इतके परीक्षा शुल्क आकारले जाईल.
पात्रतेचे निकष काय?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवाराने किमान 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयासह) असणे आवश्यक आहे किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखांमधील 3 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा फिजिक्स-मॅथ्स या गैर-व्यावसायिक विषयासह 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. याशिवाय 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना इंग्रजी विषयात स्वतंत्रपणे किमान 50% गुण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर उमेदवाराचा जन्म 1 जुलै 2005 ते 1 जानेवारी 2010 दरम्यान झालेला असावा (दोन्ही दिवस धरून). शारीरिक पात्रतेमध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांची उंची किमान 152 सेमी असणे आवश्यक आहे, तर पुरुषांसाठी छाती 77 सेमी आणि 5 सेमी फुगवण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर : जुहू चौपाटीवरुन हटवला 1800 मेट्रिक टन कचरा, बीएमसी काय करत आहे?
वेतन किती मिळणार?
चार वर्षांच्या या सेवाकाळात अग्निवीरवायु उमेदवारांना आकर्षक वेतन आणि भत्ते दिले जातील. पहिल्या वर्षी महिन्याला 30,000 रुपये वेतन मिळेल, ज्यातील 21,000 रुपये हातात मिळतील आणि 9000 रुपये कॉर्पस फंडात जमा होतील. दुसऱ्या वर्षी वेतन 33,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये आणि चौथ्या वर्षी 40,000 हजार रुपये दिले जाईल. दरमहा उमेदवाराच्या वेतनातून कापली जाणारी 9,000 ते 12,000 रुपयांपर्यंतची रक्कम कॉर्पस फंडात जमा होईल आणि तेवढीच रक्कम सरकारकडूनही दिली जाईल. चार वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांना व्याजाशिवाय अंदाजे 10.04 लाख रुपयांचे 'सेवा निधी पॅकेज' एकरकमी दिले जाईल.
हे ही वाचा : लातूर : ह्रदयरोग तज्ज्ञ मेहुल राठोड यांच्या आत्महत्येने हळहळ, गुंगीचं औषध घेतलं अन्...
अग्निवीर स्किल सर्टिफिकेट
या सेवेदरम्यान अग्निवीरांना भविष्य निर्वाह निधी (PF) ची कोणतीही कपात लागू असणार नाही, तसेच ते कोणत्याही ग्रॅच्युइटी किंवा पेन्शन लाभांसाठी पात्र नसतील. मात्र, सेवाकाळात उमेदवारांना 48 लाख रुपयांचे मोफत जीवन विमा संरक्षण दिले जाईल. तसेच मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास नियमानुसार योग्य भरपाई दिली जाईल. चार वर्षांची सेवा संपल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला एक 'अग्निवीर स्किल सर्टिफिकेट' दिले जाईल, ज्यामध्ये त्यांनी सेवाकाळात आत्मसात केलेले कौशल्य आणि कार्यक्षमतेचा उल्लेख असेल, ज्यामुळे त्यांना भविष्यात इतर रोजगाराच्या संधी मिळवणे सोपे होईल. अधिक माहिती व अटींसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला (iafrecruitment.edcil.co.in) भेट द्यावी.










