नागरिकांनो, थेट तक्रार नोंदवा; तुकाराम मुंढेंचं आवाहन
राज्यातील नागरिकांना आता अन्न भेसळ, असुरक्षित किंवा चुकीचे लेबल असलेल्या खाद्यपदार्थांबाबत थेट आणि जलद गतीने तक्रार करता यावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने एक अत्याधुनिक तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अन्न भेसळीविरोधात नवे अस्त्र
आता फक्त बोला आणि तक्रार नोंदवा
तुकाराम मुंढेंनी काय सांगितलं?
Tukaram Mundhe : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यातील नागरिकांना आता अन्न भेसळ, असुरक्षित किंवा चुकीचे लेबल असलेल्या खाद्यपदार्थांबाबत थेट आणि जलद गतीने तक्रार करता यावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA Maharashtra) एक अत्याधुनिक तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'एक्स'वर या महत्त्वपूर्ण सुविधेची माहिती दिली आहे. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
तक्रार थेट अधिकाऱ्यापर्यंत पोहोचणार
नागरिकांना जर कुठेही भेसळयुक्त, आरोग्याला घातक किंवा चुकीचे लेबल लावलेले अन्नपदार्थ आढळल्यास ते या पोर्टलवर थेट अन्न व औषध प्रशासनाकडे आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकाने केलेली ही तक्रार थेट संबंधित भागातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवली जाते. अन्न सुरक्षा अधिकारी या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी, तपासणी आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करतील. यामुळे बाजारातील बनावट आणि निकृष्ट अन्नपदार्थांच्या विक्रीला मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा : बंदी असताना महाराष्ट्रात गुटखा कसा काय मिळतो? तुकाराम मुंढेंनी थेट कारण सांगितलं..
'अशी' नोंदवा तक्रार
या पोर्टलचे कार्य अतिशय सोपे असून यामध्ये तीन सोप्या पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीत, नागरिकांना काय घडले आहे ते मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाईप करून किंवा बोलून सांगावे लागेल. दुसऱ्या पायरीत, पोर्टलचा AI सहाय्यक या सर्व तपशिलांची पडताळणी करेल आणि अचूक तक्रार तयार करेल. तर तिसऱ्या व अंतिम पायरीत, ही तक्रार थेट योग्य अन्न सुरक्षा अधिकाऱ्याकडे पाठवली जाईल, जे या प्रकरणाचा तपास करून तातडीने कारवाई करतील.
हे ही वाचा : केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर FDA ची मोठी कारवाई
'ही' आहे वेबसाइट
हे नवे डिजिटल पोर्टल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी सोपी पद्धत आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता येणार असून, अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व देखील निश्चित होणार आहे. complaints.mahafda.in या वेबसाईटवर ही तक्रार नागरिकांना नोंदवता येणार आहे. 1800-222-365 या टोलफ्री क्रमांकावरही तक्रार नोंदवता येणार आहे.










