मुंबईची खबर : जुहू चौपाटीवरुन हटवला 1800 मेट्रिक टन कचरा, बीएमसी काय करत आहे?
जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातून स्वच्छता व मान्सूनपूर्व तयारीबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : जुहू चौपाटीवरुन हटवला 1800 मेट्रिक टन कचरा
बीएमसी काय करत आहे?
Mumbai News : मुंबईत गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे समुद्रातून वाहून आलेला कचरा जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर साचला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 दिवसांत जुहू चौपाटीवरून तब्बल 1,800 मेट्रिक टन कचरा हटवण्यात आला आहे. सामान्य दिवसांत या ठिकाणी दररोज सुमारे 60 मेट्रिक टन कचरा जमा होतो, मात्र सध्या हा आकडा वाढून दररोज तब्बल 350 मेट्रिक टनवर पोहोचला आहे. जुहू चौपाटीवरील या कचऱ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, त्यामुळे मुंबईतील स्वच्छता आणि प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीवर मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
जुहू चौपाटीवर कचऱ्याचे डोंगर
या अभूतपूर्व कचरा समस्येबाबत स्पष्टीकरण देताना पालिकेने सांगितले की, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत 1,000 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे शहरातील लहान नाल्यांमधील आणि नैसर्गिक जलवाहिन्यांमधील तरंगणारा कचरा थेट अरबी समुद्रात गेला. समुद्राला आलेल्या उधाणामुळे आणि भरतीच्या तीव्र प्रवाहामुळे हा संपूर्ण कचरा पुन्हा किनाऱ्याकडे फेकला गेल्याने जुहू चौपाटीवर कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. असे असले तरी, पालिकेने येथे युद्धपातळीवर 24 तास स्वच्छता मोहीम सुरू केली असून, अतिरिक्त कामगार आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने दररोज 180 मेट्रिक टन कचरा हटवला जात आहे. तसेच गोळा केलेला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पाठवला जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
हे ही वाचा : 'जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथेच...', आदिनाथ-उर्मिलाचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
पालिकेचा निष्काळजीपणा
दरम्यान, यावरून आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी (15 जुलै) जुहू चौपाटीला भेट देऊन पाहणी केली आणि या परिस्थितीला पालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला. नालेसफाईची कामे वेळेत आणि योग्य पद्धतीने न झाल्यामुळेच नाल्यांमधील कचरा समुद्रात आणि पर्यायाने चौपाटीवर आल्याचे त्यांनी म्हटले. केवळ कागदावर खर्च दाखवून प्रत्यक्षात कामे झाली नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला. त्यामुळे मान्सूनपूर्व कामांच्या दर्जावर आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.
हे ही वाचा : अंबरनाथ लोकलमध्ये सीटचा वाद, लोखंडी कड्याने हल्ला; घटनेचा रक्तरंजित थरार
अमित साटम यांचा दौरा
दुसरीकडे, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनीही पालिका अधिकाऱ्यांसह जुहू चौपाटीचा दौरा करत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी पालिकेला अधिक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करून काम अधिक वेगवान करण्याचे निर्देश दिले. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी मोठे नाले आणि नद्या समुद्राला मिळतात, त्या ठिकाणी 'ट्रॅश बूम' (कचरा अडवणारे बॅरियर्स) बसवण्याच्या सूचना त्यांनी पालिकेला दिल्या, जेणेकरून कचरा समुद्रात जाणार नाही. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बीएमसीने या परिस्थितीवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले असून, कचऱ्याची समस्या पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत प्राधान्य तत्त्वावर ही मोहीम सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.










